ठरलं तर मग ही स्टार प्रवाहवरील मालिका प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याने गेल्या तीन आठवड्यापासून ही मालिका नंबर एक वर येऊन पोहोचली आहे. नुकतेच मालिकेने १०० एपिसोडचे शूटिंग यशस्वीपणे पूर्ण केले असून मालिकेच्या सेटवर केक कापून हे सेलिब्रेशन करण्यात आलं. या मालिकेचे यश त्यातील कलाकार मंडळी, दिग्दर्शक, लेखक, बॅक आर्टिस्ट या सर्वांचेच आहे. या मालिकेची निर्मिती आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचे आहे. आज मालिकेतील नायकाची आई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
प्राजक्ता कुलकर्णी यांनी ठरलं तर मग मालिकेत कल्पना सुभेदाराची भूमिका साकारली आहे. प्राजक्ता कुलकर्णी यांनी बालमोहन शाळेतून शिक्षण घेतले. चार बहिणी आणि आई वडील दोघेही नोकरीला असे त्यांचे कुटुंब. पाचवीत असताना सुलभा देशपांडे यांच्या चंद्रशाळा मध्ये प्राजक्ता सहभागी झाली. तिथे गेल्यावर नृत्यासोबतच त्या मुलांच्या अभ्यासावरही लक्ष्य द्यायच्या, त्यामुळे प्राजक्ताचे आईवडील बिनधास्त झाले होते. दहावी इयत्तेत शिकत असताना प्राजक्ताला प्रथमच चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली होती. त्यावेळी आईचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला होता. मात्र नातेवाईकांनी त्यांचे दहावीचे वर्ष म्हणून आईला काळजी घेण्यास सांगितले. चित्रपटात काम करणार की अभ्यास करणार म्हणून नावंही ठेवली गेली.
मात्र जेव्हा एक नायिका म्हणून प्राजक्ताला प्रसिद्धी मिळाली तेव्हा हेच नातेवाईक तिच्यासोबतची ओळख सगळीकडे मिरवू लागले. धडाकेबाज चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका बनून प्राजक्ता कुलकर्णी यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. गावरान ठसकेबाज गंगू त्यांनी आपल्या अभिनयाने चांगलीच वठवलेली पाहायला मिळाली. याचदरम्यान आर्किटेक्ट असलेल्या मुलाशी त्या विवाहबंधनात अडकल्या आणि दिघे कुटुंबाच्या सून झाल्या. लग्नानंतर घरच्यांच्या पाठिंब्यामुळे त्या पुन्हा कलासृष्टीत दाखल झाल्या. आग, शोध, ऋणानुबंध, छत्रीवाली, पोरबाजार, का रे दुरावा, दुर्गेश नंदिनी, धांगड धिंगा. ऑल द बेस्ट, दामिनी, आपली माणसं, गुंज, एक कहाणी, चार दिवस सासूचे अशा चित्रपट, मालिकेतून प्राजक्ता कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या.
मुलगा जयच्या जन्मानंतर मधल्या काही काळात त्यांनी या सृष्टीतून ब्रेक घेतला. पण आता ठरलं तर मग मालिकेतील कल्पना आईच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्राजक्ता कुलकर्णी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागल्या. सायलीच्या बाजूने नेहमी बोलणाऱ्या तिच्या ह्या सासूबाई प्रेक्षकांनाही आपलेसे करून गेल्या आहेत. लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मालिके मधील भूमिकेसाठी प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.