गेल्या काही दिवसांपासून टिकलीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा रंगवल्या जाऊ लागल्या. एका महिला वार्ताहराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून संभाजी भिडे गुरुजी यांनी तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले होते. त्यावरून महिला वार्ताहराने व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु कपाळावर कुंकू,टिकली लावली तर अनेक चांगले परिणाम शरीरावर घडत असतात असाही मुद्दा काही जणांनी मांडला. याची अनेक शास्त्रीय कारणे देखील देण्यात आली. हिंदू स्रियांनी कुंकू किंवा टिकली लावावी यामुळे आपली संस्कृती टिकून राहते असेही अनेक मुद्दे पुरुषच नाही तर महिला वर्गाने देखील उचलून धरलेले दिसले.
ह्याच मुद्द्याला अनुसरून फु बाई फु या शोमध्ये एक प्रहसन सादर करण्यात आले. प्राजक्ता हनमघर आणि किशोर कदम हे प्रहसन सादर करत असतात. दोघेही नवरा बायकोच्या भांडणापासून या सादरीकरणाची सुरुवात करतात. आपल्या बायकोने टिकली लावली नाही म्हणून या दोघांमध्ये वाद सुरू असतो. त्यावर मी पण एक बाईच आहे ना! असे म्हणत प्राजक्ता या मुद्द्याचे स्पष्टीकरण देताना म्हणते की, टिकली लावायची का नाही लावायची हे बाईला ठरवू द्या ना! टिकली म्हणजे नवरा जिवंत असल्याचं प्रतीक मग मी आरशाला टिकली लावून अंघोळीला जाते. तेवढ्या वेळात आरशाला येऊन चिकटतात की काय आणि मेकअप करताना तर मी कितीवेळ बिना टिकलीची असते तेवढ्या वेळेत कोमात जाता की काय?
आपलं हे नातं प्रेमावर टीकलंय टिकलीवर नाही, हे ती यात अधोरेखित करताना दिसते. प्राजक्ताच्या या मुद्द्यावर उमेश कामत आणि इतर सेलिब्रिटी तिच्या मांडलेल्या विचाराचं कौतुक करतात. मात्र प्रेक्षकांनी या मतावर संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे; तर काही जणांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. टिकली, कुंकू म्हणजे आपली संस्कृती, टिकली म्हणजे स्त्रीचा अलंकार या विनोदातून आपल्याच लोकांनी आपल्या धर्माची खिल्ली उडवली आहे. आपली संस्कृती आपणच टिकवली नाही तर येणारी पिढी देखील याचे अनुकरण करणार नाही. अशी वेगवेगळी मतं प्रेक्षकांनी मांडून विरोध दर्शवला आहे. प्राजक्ताला सोशल मीडियाच्या माध्यमातून अशीच एक प्रतिक्रिया मिळाली.
तुम्ही झी टीव्हीवर जो टिकली संदर्भात एपिसोड केला, तुमच्या म्हणण्यानुसार टिकली लावलीच पाहिजे असं काही नाही ना. पण तुम्हाला जसं राहायचं तसं तुम्ही राहा. लोकांना चुकीचे मार्गदर्शन करू नका. खरं तर ट्रोलर्सच्या प्रश्नांना अनेक कलाकार मंडळी उत्तर किंवा प्रतिक्रिया देण्याचे टाळत असतात. मात्र नेटकऱ्याच्या या सडेतोड भूमिकेवर प्राजक्ता म्हणते की, ‘सर्व प्रथम प्रतिक्रिया चांगल्या शब्दात दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मार्गदर्शन नाहीच त्यात, ज्याला जे योग्य वाटेल ते असं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य जपूया इतकंच’. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विनोदी कार्यक्रमातून केवळ विनोदच दाखवला जावा असाही मुद्दा इथे उपस्थित केला जात आहे.