छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान सरदार आणि मावळ्यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या चित्रपटातून केले आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकणारा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवताना दिसत आहे. नुकतेच नाट्यगृह आणि चित्रपट गृहांवरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पूर्ण आसनक्षमतेने चित्रपट गृहांना प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होताना दिसत आहे. मागील दोन आठवडे ५० टक्के आसनक्षमता असताना देखील या चित्रपटाने तिकीट बारीवर चांगली कमाई केली आहे हेच या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल.
१८ फेब्रुवारी २०२२ रोजी पावनखिंड चित्रपट प्रदर्शित झाला होता. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने १२.१७ करोडोंचा पल्ला गाठलेला पाहायला मिळाला. पहिल्या आठवड्यातील शनिवार आणि रविवारी या दोनच दिवसात चित्रपटाने तब्बल ५.२३ करोडोंपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या आठवड्यात देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १०.०९ एवढ्या कोटींची कमाई केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे या दोन आठवड्यात चित्रपटाने एकूण २२.०८ करोडोंचा टप्पा पार केलेला पाहायला मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी निर्बंध हटवण्यात आल्यानंतर चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला होता. १०० टक्के क्षमतेने चित्रपट गृह भरवण्यात आल्यामुळे या दोन दिवसात चांगली कमाई झालेली पाहायला मिळाली.
त्यामुळे आता तिसऱ्या आठवड्यात देखील पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांची उपस्थिती मिळू लागल्याने पावनखिंड हा चित्रपट आणखी कमाई करणार याची खात्री पटली आहे. काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने देखील पावनखिंड हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला. आणि तो या चित्रपटामुळे भारावून गेलेला दिसला. आजवर प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांत पावनखिंड सर्वार्थी उजवा ठरत आहे. अजय आरेकर निर्मित, लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची जादू रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालत आहे हे मात्र नक्की. अर्थात त्यांच्या या प्रयत्नांना चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, हरीश दुधाने, समीर धर्माधिकारी व चित्रपटातील सर्व कलाकारांची कलाकारांची भक्कम साथ लाभली आहे.