पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘जंगलाच्या विश्वकोश’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुलसी गौडा यांची प्रेरणादायी कहानी सांगते की शिक्षण आणि साधनांशिवाय मोठा बदल घडवून आणला जाऊ शकतो. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अनेक मान्यवरांमध्ये तुलसीगौडा यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. अनवाणी अन अंगावर गुंडाळलेला एकाच कपड्यात जंगलाच्या जिवंत विश्वकोश राष्ट्रपती पुरस्कारासाठी जेव्हा हजर झाल्या तेव्हा त्यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपारिक गुंडाळलेली साडी, गळ्यात मनगटात दागिने आणि आणि केस एका अंबाड्यात बांधलेले अशा सध्या वेशातील तुलशी संवर्धन केलेल्या आपल्या झाडांकडे अभिमानाने पाहते.
पर्यावरणवादी तिला मानवी “जंगलाचा विश्वकोश” म्हणतात, परंतु तिच्या जमातीत हलक्की वोक्कलिगा तिला “वनदेवी” म्हणून ओळखले जाते. तुळशी गौडा जीवनसंघर्षाचे सवोत्तम उदाहरण आहे, शिक्षण आणि आधुनिक संसाधनांशिवाय जंगलात आमूलाग्र बदल घडवून आणता येतील याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. तुलशी यांचा जन्म कर्नाटकातील हलक्की जमातीच्या कुटुंबात झाला. तीन वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. आई आणि बहिणीसोबत कर्नाटक वनविभागात मजुरी करू लागल्या. कुटुंबातील या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शाळेत जाऊन प्राथमिक शिक्षण देखील घेता आले नाही. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले पण दुर्दैवाने पतीचेही अकाली निधन झाले. आपल्या आयुष्यातील दुःख आणि एकाकीपणावर मात करण्यासाठी तुलशी गौडा यांनी विविध वृक्ष लावणे आणि त्यांची काळजी घेण्याचे काम सुरु ठेवले. सात दशकांच्या प्रदीर्घ काळात वनक्षेत्रात काम करताना खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक वारशामुळे संरक्षण, देखरेख आणि लागवड करण्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
तुलसी गौडा नामशेष होत आलेल्या वनस्पतींचे संगोपन करून तरुण पिढीला पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत आल्या आहेत.७२ वर्षांच्या तुळशी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात किती लहान मोठी झाडे, वेली लावल्या याचे मोजमाप करता येणार नाही. महाकाय वृक्षांपासून ते लहान झुडपांपर्यंत वनस्पतींचे जंगल तयार करण्याचे अद्भुत ज्ञान त्यांच्याकडे आहे. कोणत्या झाडाला किती पाणी द्यायचे, कोणत्या प्रकारच्या मातीत कोणती झाडे आणि वनस्पती वाढतात, कोणत्या लता वेली एकमेकांना पूरक होतील, औषधी गुणधर्मांची झाडे कोणती हे सर्व त्यांना तोंडपाठ आहे. विविध वनस्पती वृक्षांचे उपयोग त्यावर अवलंबून असणारी जैवविविधता आणि पक्षी प्राण्यांना त्यांच्या या ज्ञानामुळे होणारा उपयोग या सर्वांच्या समीकरणामुळे त्यांना “जंगलाच्या विश्वकोश” असेही संबोधले जाते. शाळेत शिकलेल्या नसतानाही तुलशी यांचे जंगल आणि वनस्पतींचे ज्ञान एखाद्या पर्यावरणवादीशास्त्रज्ञ पेक्षा कमी नाही.
आजही तुलशी वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सक्रिय आहेत. त्याच बरोबर त्या लहान मुलांना झाडांशिवाय ही पृथ्वी जगण्यास योग्य नाही, आपल्या जीवनासाठी किती महत्वाची आहेत अशी शिकवण देतात. निसर्गावरील प्रेमामुळे आजही त्या जास्तीत जास्त वेळ जंगलात घालवितात. जंगलातील कोणत्याही ठिकाणी प्रत्येक प्रजातीचे मातृवृक्ष ओळखण्यास त्या सक्षम आहेत. जेव्हा मातृवृक्षातून बिया येतात तेव्हा वनस्पतींचे पुनरुत्पादन अधिक यशस्वी होते. ही झाडे कधी फुलतात आणि अंकुरतात हे तुलशी यांना माहीत आहे आणि त्या बिया गोळा करण्यासाठी सर्वोत्तम क्षण निवडतात. त्यांना हे लेखी स्वरूपात मांडता येत नाही परंतु ही जंगलाची भाषा अनुभवाने अवगत आहे. त्यांचे हे अनमोल काम पाहणे देखील एक अविश्वसनीय अनुभव आहे.