“आयुष्यात मला भावलेले एक गुज सांगतो, उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा पण एवढ्यावरच थांबू नका, साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प आणि खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे शिकवून जाईल.” पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ भाई हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला परमेश्वराने दिलेले वरदान आहे. भाई साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये निर्विवाद वावरले, त्यांचे लिखाण आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी अभिनय, नाटके, एकपात्री प्रयोग, अगदी चित्रपटांची निर्मितीही केली. अशा अष्टगुणी कलाकारास मराठी माणूस कधी विसरूच शकणार नाही हे त्रिवार सत्य.
कुबेर, भाग्य रेखा, वंदे मातरम्, पुढचं पाऊल, जोहार मायबाप, ही वाट पंढरीची, अंमलदार, गुळाचा गणपती या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. याव्यतिरिक्त प्रस्तावना, निवेदन, पटकथा, संवाद, कथा, संगीत, गीते आणि पार्श्वगायन देखील देणारा हा अष्टपैलू कलाकार पुन्हा होणे नाही. पुलंचे समाजमनाचे व समाजातील आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर निरीक्षण असायचे. त्यांना भेटलेल्या लोकांचे, त्यांच्या स्वभावाचे, गुणदोषाचे लिखाणात सहज उल्लेख व्हायचा. विनोदाची झालर देऊन त्या व्यक्तिरेखेचा अनोखी मांडणी करायचे. आपल्या सहज लेखनातून समाजातील गुणदोषांना उघडे करून दाखवीत. पुल आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण रसिकतेने जगले, लहान थोर व्यक्तींमध्ये त्यांना लिहिण्यासारखं सापडायचं. उशिरा आलेल्या गाडीने आपण वैतागतो, पण तोच वेळ प्लॅटफॉर्मवरील व्यक्ती, त्यांचे खाणेपिणे, खेकसून बोलणे इत्यादींचा अभ्यास करून त्याची ते नोंद ठेवीत. पानवाल्याच्या पानाबरोबरच पुलंनी त्याच्या लादीचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक केले. रावसाहेबांची शिवराळ भाषा, नामू परिटाचा शर्ट, एवढंच काय तर पाळीव प्राण्यांच्या मालकाविषयी अशी विनोदी बाजू मांडली की अगदी प्राणी देखील खुश व्हावेत.
त्यांनी भक्तिगीतांना व चित्रपट संगीताला सुंदर चालीही लावल्या. छोट्या मुलांसाठी लिहिलेल्या एकांकिका, बालगीते यात ‘नाच रे मोरा’ चा आवर्जून उल्लेख करावा वाटतो, त्यांचे हे योगदान वाखाणण्याजोगे आहे. पुलंच्या विनोदाला कधी चावटपणा चाटून जातो, तर कधी ते कोणाला वात्रट वाटतील. पुलंचे विनोद निर्मळ असत, त्यात अश्लीलता कधीच नसायची. गरिबाची पुलंनी कधी खिल्ली उडविली नाही, पण अंधश्रद्धा आणि ढोंगी लोकांवर त्यांनी विनोदाचे आसूड उगारले हे तेवढेच खरे. सुनीताबाईंची आयुष्यभराची साथ या सर्व प्रवासात त्यांना कायम लाभली. मराठी माणसाला चिंता, अडचणींचे गाठोडे बांधून हसायला लावणारा हा पुरुषोत्तम जिवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडतो. पुलंची प्रवासवर्णन, आत्मचरित्र, विनोदी साहित्य यावर डझनभर पुस्तके प्रकाशित आहेत, तुम्ही कोणकोणती वाचलीत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.