स्टार प्रवाह वाहिनीवर पिंकीचा विजय असो ही नवी मालिका प्रसारित होत आहे. ही मालिका नीम की मुखीया या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे दिसून येते. मालिकेतून नखरेल पिंकीची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तिला बंटी, निरी आणि दिप्याची चांगली साथ मिळत आहे. पिंकीच्या गावात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सरपंच पदासाठी महिलांना राखीव उमेदवारी देण्यात आली आहे. प्रमुख दावेदार असणाऱ्या धोंडे पाटील घराण्याला मात्र चांगलीच चपराक बसली आहे. आता महिला उमेदवार म्हणून पिंकीच निवडणूक लढवणार का हे येत्या काही भागात पाहायला मिळेल. मालिकेत पिंकीला वेळोवेळी साथ देणारी तिची धाकटी बहीण म्हणजेच निरी प्रेक्षकांचे विशेष लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे.
साधी आणि तितकीच समजुतदार असलेल्या निरीचे पात्र मालिकेत भाव खाऊन जाताना दिसते. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री सारिका साळुंके हिने. सारिका ही मूळची साताऱ्याची, इथेच तिने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडीओ पाहायला मिळतात अशाच माध्यमातून सारिकाला चमकण्याची संधी मिळाली. वाडीवरची स्टोरी या सिरीज अंतर्गत विनोदी व्हिडीओ सादर करण्यात येतात, त्यात सारिका मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. राहुल वाघमारे लिखित आणि दिग्दर्शित पक्के सातारी या वेबसिरीजमध्ये देखील सारिका एका महत्वपूर्ण भूमिकेत पहायला मिळाली. महत्वाचं म्हणजे धर्मेंद्र यादव दिग्दर्शित शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ही वेबसिरीज खूपच चर्चेत राहिली.
या वेबसिरीजने जवळपास ११ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणले. त्यातील काजलचे पात्र खूपच लोकप्रिय ठरले. सारिकाला हे पात्र साकारण्याची नामी संधी मिळाली. इथूनच तिला खरी ओळख मिळाली असे म्हणायला हरकत नाही. पिंकीचा विजय असो या मालिकेतून ती प्रथमच छोट्या पडद्यावर झळकताना दिसत आहे. या मालिकेचे चित्रीकरण सातारा जिल्ह्यातील वाई या सांस्कृतिक नगरीत केले जात आहे. त्यामुळे मालिकेने स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. पदार्पणातील पहिल्या वहिल्या मालिकेमुळे सारिकासाठी ही मालिका पर्वणी ठरली आहे. पिंकी, निरी आणि दिप्या हे अतरंगी भावंडं प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. नीरीच्या भूमिकेसाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी सारिका साळुंके हिला मनःपूर्वक शुभेच्छा.