झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच या शोचा दहा वर्षाचा आढावा घेणारा सोहळा साजरा करण्यात आला. कुशल बद्रिके, भाऊ कदम, अंकुर वाढवे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, तुषार देवल, योगेश शिरसाट यांसह रोहित चव्हाण, स्नेहल शिदम यांनीही चला हवा येऊ द्या च्या मंचावर धमाल उडवून दिली. मात्र या सोहळ्याला चला हवा येऊ द्या शोचा सर्वेसर्वा असलेला निलेश साबळे मात्र अनुपस्थित राहिला.
चला हवा येऊ द्या शो ची धुरा समर्थपणे सांभाळणारा निलेश साबळेच दहा वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. गेल्याच आठवड्यापासून निलेश साबळेने चला हवा येऊ द्या मधून काढता पाय घेतला होता. तेव्हा श्रेया बुगडे हिने निलेशची जागा सांभाळली होती. पण त्यामुळे अनेकांनी निलेश साबळेला मिस केलेले पाहायला मिळाले. तो या शोमध्ये का नाही? या प्रश्नाचे उत्तर त्याने काही दिवसांपूर्वीच दिले होते. आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्यामुळे निलेश साबळे चला हवा येऊ द्या मधून बाहेर पडला असे त्याने म्हटले होते. मात्र आता त्यानंतर चला हवा येऊ द्या बंद पडणार अशी एकच चर्चा पाहायला मिळाली. या शोच्या कलाकारांना दहा वर्षे काम दिल्याने झी मराठीचे आभार मानले.
तर कुशल बद्रिके हिंदी रिऍलिटी शो चा भाग बनला आहे. निलेश साबळे, कुशल बद्रिके सारखे तगडे कलाकारच शोमध्ये नसल्याने आता हा शो बंद होणार अशी चर्चा सुरू आहे. मग आता चला हवा येऊ द्या नंतर काय? असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला आहे. पण याचेही उत्तर निलेश साबळेने दिलेले आहे. लवकरच निलेश साबळे त्याच्या दोन नवीन प्रोजेक्टसाठी मोठी मेहनत घेत आहे. एक वेबसिरीज आणि एक चित्रपट अशा दोन प्रोजेक्टमध्ये तो व्यस्त असल्याने निलेशला चला हवा येऊ द्या मध्ये येण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. याच कारणामुळे निलेश साबळेच्या आरोग्याबाबत तक्रारी वाढत चालल्या होत्या. कामावरचा अधिकचा ताण कमी करण्यासाठीच त्याने या शोमधून काढता पाय घेतलेला आहे. त्याचमुळे आता चला हवा येऊ द्या नंतर लवकरच निलेश मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.