झी मराठी वाहिनीवर सत्यवान सावित्री ही नवी मालिका दाखल होत आहे. या मालिकेत वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे सत्यवान सावित्रीच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या प्रमोशनखातर झी मराठीची कलाकार मंडळी पुढे सारसावलेली पाहायला मिळत आहेत. स्वप्नील जोशीने देखील त्याच्या सवित्रीबद्दल म्हणजेच लीनाबद्दलच्या काही खास गोष्टींचा उलगडा केला आहे. स्वप्नील म्हणतो की लीना सोबत माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा ती माझ्या आई वडिलांची काळजी घेईल की नाही हा प्रश्न होता. मात्र ती जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हा ती माझ्या अगोदर माझ्या आईवडिलांची झाली होती.
चला हवा येऊ द्या फेम निलेशने देखील आपल्या आयुष्यातल्या सावित्रीबद्दल खास गोष्टी सांगतल्या आहेत. यावेळी तो गौरीबद्दल म्हणतो की, खरं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सावित्री फार महत्वाची असते ती म्हणजे आपली अर्धांगिनी. प्रत्येकाच्या आयुष्यात पत्नी महत्वाची असते तशीच माझ्याही आयुष्यात आहे तिचं नाव आहे डॉ गौरी साबळे. आज आमच्या लग्नाला ९ वर्षे झालेली आहेत. या सगळ्या प्रवासात जिने मला उत्तम साथ दिली. आमचा प्रेमविवाह आहे आणि ज्यावेळेला मी काहीच कमवत नव्हतो त्यावेळी तिने मला होकार दिला होता. तिने मला विचारलं होतं की, तू प्रॅक्टिस करशील की आवडत्या क्षेत्रात तू जाणार आहेस? त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी कदाचित प्रॅक्टिस नाही करणार, पण तिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला.
त्यानंतर ती मला म्हणाली होती जर तुला काम लवकर नाही मिळालं तरी मी आहे तुझ्याबरोबर. मी प्रॅक्टिस करेन आणि घर चालवेन पण तुला ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जा. ती उत्तम कलाकार आहे, ती छान गाते, चित्रकलेची तिला खूप आवड आहे. पण या सगळ्या कला तिच्याकडे असताना सुद्धा केवळ आणि केवळ मला पुढे जाता यावं म्हणून ती त्या कलांकडे आतापर्यंत दुर्लक्ष करत आलेली आहे. मला वाटतं तिने सुद्धा आता त्या कलांकडे लक्ष्य दिलं पाहिजे. माझ्या प्रत्येक गोष्टीत ती माझी साथ देते. माझं जास्त जागरण होऊ नये म्हणून तीने लिखाण, एडिटिंग सुद्धा शिकून घेतलं आहे. ती विनोद सुचवते, वेगवेगळ्या कल्पना मांडते या सगळ्या गोष्टीत ती उत्स्फूर्त सहभाग दर्शवते.
मला वाटतं की कुठल्याही माणसाला काय हवं असतं की आपला जो पार्टनर आहे, त्याला आपल्या कामात आनंद मिळावा अशी ही माझी सावित्री आहे. तिचा मला अभिमान आहे असे म्हणत तो आपल्या सावित्रीचे कौतुक करताना दिसला. २०१३ साली निलेश साबळे आणि गौरीचा विवाह संपन्न झाला होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या दोघांची कॉलेजच्या फंक्शनमध्ये भेट झाली. तिथेच निलेशला गौरी आवडू लागली. लेखन, निवेदन, अभिनेता आणि दिग्दर्शन अशा विविध भूमिकेत दिसणाऱ्या निलेश सबळे आयुर्वेदिक डॉक्टर असून एमएसची पदवी मिळवली आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कर्तृत्ववावर त्याने मराठी सृष्टीत ओळख निर्माण केली आहे. त्याच्या या प्रवासात पत्नीचा वाटा तितकाच मोलाचा आहे असे तो म्हणताना दिसतो.