काल कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावर रिऍलिटी शोचा अंतिम सोहळा पार पडला. या स्पर्धेत सुरेखा पुणेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. जून महिन्यात सुरू झालेल्या या सहाव्या सिजनची काल रविवारी सांगता झाली. अंतिम फेरीत शुभम बोऱ्हाडे याला उपविजेतेपद मिळाले आहे. शुभमला २ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर विजेतेपद नेहा पाटील हिने पटकावले आहे. तिला विजेत्या ट्रॉफीसह ३ लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. शुभम बोऱ्हाडे आणि नेहा पाटील दोघांमध्ये शेवटपर्यंत चुरशीची लढत रंगली होती.
दोघांपैकी विजेतेपदावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरली होती. शोचे सूत्रसंचालन अक्षय केळकरने उत्तम निभावले होते. तर क्रांती रेडकर, आशिष पाटील, अभिजित पानसे यांनी परिक्षकांची भूमिका साकारली होती. समता माने, संजना सेरिया, प्रिया नसकर, तनुजा शिंदे, सानिका भागवत, नेहा पाटील, शुभम बोऱ्हाडे, लेडी गोविंदा अशी ओळख असलेली अदिती जाधव, काजल गोसावी, भैरवी मेस्त्री, नम्रता, धनिष्ठ काटकर यांनी ढोलकीच्या तालावर या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. ढोलकीच्या तालावर या रिऍलिटी शोचा हा ६ वा सिजन होता. यातील स्पर्धकाला लावणीसम्राज्ञी हे विजेतेपद दिले जाते. २०११ ते २०१७ पर्यंत या शोचे पाच सीझन प्रसारित झाले होते.
शोच्या पहिल्या सीझनमध्ये स्नेहा वाघ, सोनाली खरे आणि इतर अभिनेत्रींनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आणि वैशाली जाधवने त्यावेळी विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली होती. या शोने नंतर नर्तकांना स्पर्धक म्हणून आमंत्रित केले आणि त्याचे पाच सीझन यशस्वीरित्या पूर्ण केले. दिपाली सय्यद, विश्वास पाटील, लावणी क्वीन शकुंतला नगरकर आणि मानसी नाईक अशांनी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले होते. सुबोध भावेने या शोचे सूत्रसंचालन म्हणून काम पाहिले होते. सेलिब्रिटी पर्व असो किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याचमुळे नेहा पाटील विजेती झाली हे कळताच सर्वच स्तरातून तिचे मोठे कौतुक केले जात आहे.