कलाकारांना वर्षानुवर्षे काम करूनही नवीन भूमिकेसाठी नकार दिला जातो. हा अनुभव स्वतः रेणुका शहाणे यांनी घेतला आहे. आज इतकी वर्षे अभिनय क्षेत्रात काम केल्यानंतरही त्यांना बॉलिवूड चित्रपटात काम मिळवण्यासाठी उंबरठे झिजवावे लागत आहेत. तर बहुतेक कलाकारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेते डॉ विलास उजवणे यांची प्रकृती खालावल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांपासून ते ब्रेन स्ट्रोकमुळे त्रस्त आहेत, तर कावीळ आणि अन्य आजारांनी त्यांना नव्याने ग्रासले आहे.
प्रदीर्घ आजारामुळे गेल्या काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. म्हणूनच मीडियाच्या माध्यमातून त्यांनी उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मदत मागितली होती. अशा अनेक खडतर परिस्थितीचा सामना या कलाकारांना करावा लागतो. मात्र या गोष्टींमुळे प्रेक्षकांकडून त्यांना टीका सहन करावी लागते. हे क्षेत्र बेभरवशाचे आहे, कलाकार आपल्या कलेचा वापर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी करत असतो. आपला घरसंसार चालवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे यश संपादन करता येते. याच अनुषंगाने ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी खंत व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. एक पोस्ट शेअर करताना त्यांनी कलाकारांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्या म्हणतात की, कलाकार मंडळी ही पृथ्वीतलावरील स्वयंप्रेरित आणि धैर्यवान लोक आहेत. इतर लोकांच्या तुलनेत आयुष्यभर नकाराचा सामना थोडासा जास्तच करत असतात. स्वतंत्र जीवनशैली जगताना त्यांना आर्थिक आव्हानांना रोज तोंड द्यावे लागते. कलाकारांना खऱ्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असे वाटत असलेल्या लोकांकडून मिळणारा अनादर. आणि पुन्हा काम मिळणार की नाही याची शास्वती त्यांना रोज दुर्लक्ष करावी लागते. कलेच्या देवतेला सर्वस्व समर्पित करून सकारात्मक दृष्टिकोनातून स्वप्नांचा पाठलाग करण्यासारखे त्यांचे आयुष्य आहे. प्रत्येक सरत्या वर्षामागे जीवनात येणाऱ्या नवनवीन गोष्टीसह यशस्वी टप्पा गाठणे हे ध्येय बनले आहे. कलाकार आयुष्यात येणाऱ्या संकटांशी दोन हात करत आपल्या स्वप्नाशी नेहमी एकनिष्ठ राहिला आहे.
कारण कलाकाराने आपले आयुष्य रसिक प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या त्या शब्दांच्या ओळींना, विनोदांना, त्या अदाकारीला वाहिलेले असते. कलाकार हे जणू जीवनातील अमृत चाखून रसिक प्रेक्षकांच्या ओंजळीत वाहण्याचा प्रयत्न करत असतात. त्या क्षणी, ते परिपूर्णतेच्या, एखाद्या दैवी शक्तीच्या अगदी निकट पोहोचलेले असतात. कलाकाराने समर्पित केलेला तो क्षण हजारो आयुष्य जगण्या इतका पवित्र निर्मळ असतो.