लक्ष्य या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. २०११ साली सुरू झालेली ही मालिका सप्टेंबर २०१६ पर्यंत म्हणजेच जवळपास ५ वर्षे टीव्ही माध्यमातून तग धरून होती. एसीपी अभय कीर्तिकर, सलोनी देशमुख, रेणुका राठोड, दिशा सूर्यवंशी, हवालदार मारुती जगदाळे या युनिट ८ मधल्या पात्रांनी मालिकेतून विशेष लक्ष्य वेधून घेतले होते. अशोक समर्थ, श्वेता शिंदे, परी तेलंग, कमलेश सावंत आणि उदय सबनीस अशी कलाकार मंडळी दमदार भूमिकेत पाहायला मिळाली होती. मालिकेच्या या लोकप्रियते नंतर सोहम प्रॉडक्शनने नवे लक्ष्य ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली.
स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना जागरूक ठेवण्याचा आणि सतर्क राहण्याचा महत्वाचा सल्ला देताना दिसत आहे. नवे लक्ष्य या मालिकेतून सोहम बांदेकर याने अभिनय क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले आहे. यात तो यश दीक्षितच्या भूमिकेत दिसत आहे. अमित दोलावत, शुभांगी सदावर्ते, सोहम बांदेकर, अभिजित श्वेतचंद्र हे नवे लक्ष्यची धुरा समर्थपणे पेलताना दिसत आहेत. आता या नवे लक्ष्य मध्ये लक्ष्य मालिकेतील दोन अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. लक्ष्य मालिकेतील युनिट ८ मधल्या सलोनी देशमुख म्हणजेच अभिनेत्री आदिती सारंगधर तसेच रेणुका राठोडची भूमिका साकारणारी श्वेता शिंदे पुन्हा एकदा तीच पात्र रंगवताना दिसणार आहेत.
नवे लक्ष्य मालिके मध्ये युनिट ९ च्या साथीला आता लक्ष्य मधील युनिट ८ चे महिला पोलीस हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ही मालिका आता रंजक वळणावर आलेली पाहायला मिळणार आहे. आदिती सारंगधर हिने येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत विरोधी पात्र साकारले होते. मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे तब्बल ६ वर्षानंतर ती पुन्हा एकदा इन्स्पेक्टर सलोनी देशमुखची भूमिका रंगवण्यास सज्ज झाली आहे. तर श्वेता शिंदे देखील देवमाणूस या मालिकेच्या निर्मिती मध्ये व्यस्त आहे. वेळात वेळ काढून ती देखील पुन्हा एकदा रेणुका राठोडची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे.
आदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे या दोन्ही अभिनेत्रींनी या भूमिका आपल्या अभिनयाने चांगल्या रंगवल्या होत्या. त्यामुळे त्यांना पुन्हा याच भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. ज्या भूमिकांमुळे आपल्याला मराठी सृष्टीत एक वेगळी ओळख मिळाली त्याच भूमिका पुन्हा एकदा साकारण्याची नामी संधी मिळाल्याने आदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे दोघीही खूपच उत्सुक आहेत. या नव्या लक्ष्य मालिकेच्या पुनःपदार्पणासाठी दोघींचेही अभिनंदन आणि शुभेच्छा!