‘तुझ्यात जीव रांगला’ या मालिकेमध्ये नंदिताने रणा दा, लाडू आणि पाठक बाईची चांगलीच वाट लावली आहे. तिचं असं वागणं पाहून अभिनयापलीकडे विचार केला तर, तिला चांगलाच धडा शिकवावा असं तुम्हालाही कधी ना कधी हमखास वाटलं असेल. तर मंडळी आता तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण सर्वांना न आवडणारी नंदिता अर्थातच सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री कडगावकरला चक्क एका मिसळीने पक्की अद्दल घडवली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे सविस्तर माहित करुन घेऊ.
तर मंडळी त्यांचं झालं असं झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धनश्रीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील एक मजेशीर प्रसंग प्रेक्षकांना सांगितला आहे. या व्हिडिओमध्ये तिने असं सांगितलं आहे की, तिला आणि स्पेशली नंदिताला देखील मिसळ फार आवडते. मग काय एक दिवस जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ती एका कोल्हापुरी हॉटेलमध्ये पोहचली. मिसळ ऑर्डर केली खरी, मात्र तिला ती पूर्ण संपवता संपवता नाकी नऊ आले. तिला खूप त्रास होऊ लागला आणि खाता खाता डोक्यात झिणझिण्या आल्याने ती रडू लागली. आता तुम्ही म्हणाल कोल्हापूरची मिसळ म्हटल्यावर ती झणझणीत असणार म्हणून ती रडली असेल. मात्र या मागचं गुपित काही वेगळच आहे. कारण कोल्हापूरची मिसळ झणझणीत तर असते पण ही खाताना हॉटेलमधल्या इतर व्यक्तींना काहीच त्रास होतं नव्हता.
फक्त धनश्रीला ती मिसळ काही सहन होतं नव्हती. कारण यामध्ये तिथल्या आचाऱ्याने नंदितला धडा शिकवण्यासाठी मुद्दामून त्यात जास्तीचं तिखट टाकलं होतं. शिवाय त्या आचारी बुवने नदितला नंतर हे बोलून देखील दाखवलं की, “आता कसं वाटतं… आम्हाला पण असंच वाटतं जेव्हा तुम्ही राणा दां, लाडू आणि पाठक बाईला त्रास देता.” मंडळी या व्हिडिओमध्ये धनश्रीने शेवटी असं ही सांगितलं आहे की, “माझ्या आयष्यातील असेच खास किस्से ऐकण्यासाठी पाहायला विसरू नका ‘हे तर काहीच नाही’ फक्त आपल्या झी मराठीवर.” आता हे किस्से तर तुम्ही पाहाच आणि या किस्स्यांमागचं खरं गुपित आम्ही अशाच पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहचवत राहू.