नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अभिनित घर बंदूक बिरयानी हा बहुचर्चित चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही सर्व टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन, माध्यमांना मुलाखती देत जोरदार प्रमोशन करत आहे. त्याला तरुणाईकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाण की बडीव हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं गाणं चांगलीच लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. आकाश ठोसर, सायली पाटील हे कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, प्रवीण डाळिंबकर असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
घर बंदूक बिरयानी चित्रपटात महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाडा, विदर्भ एवढेच नाही तर गोव्यातील कलाकारांना सुद्धा अभिनयाची संधी देण्यात आली आहे. या सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलंय असा दावा नागराज मंजुळे यांनी केला आहे. नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने ही टीम मिलिंद कॉलेज, नागसेन भूमी येथे गेली होती. त्यावेळी प्रवीण डाळिंबकर याने त्याचे मोठे काका हे बाबासाहेबांचे विद्यार्थी असल्याचे मंगेश कुलकर्णी आणि अश्विनी पाटील यांना सांगितले. तेव्हा ही बाब नागराज मंजुळे यांना समजली. त्यांनी लगेचच प्रवीणच्या काकांची भेट घेण्याचे ठरवले. सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर नागराज मंजुळे प्रवीणच्या काकांना भेटले. प्रवीण डाळिंबकरचे काका हे बाबासाहेबांचे विद्यार्थी होते.
मिलिंद कॉलेज सुरू होण्याअगोदर एका छावणीच्या रुपात सुरू करण्यात आले होते. त्यावेळी प्रवीणचे काका तिसऱ्या बॅचचे विद्यार्थी होते. बाळासाहेब तिथे आले असताना पाय दुखू लागल्याने प्रवीणच्या काकांनी त्यांचे पाय दाबून दिले होते. ७५ दिवस नागसेन वनात त्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला होता. त्यामुळे काकांची भेट होताच नागराज मंजुळे यांनी काकांचा हात हातात घेतला. तुमचे हात बाबासाहेबांना लागले आहेत, हे हात हातात घेताना भारी वाटतंय अशी प्रतिक्रिया नागराज मंजुळे देतात. प्रवीण डाळिंबकर याने याबाबत खास व्हीडीओ टाकला आहे. सोबतच बाबसाहेबांसोबत असलेल्या आठवणींना येथे उजाळा देण्यात आला. बाबासाहेबांसोबत असलेला एक फोटो त्यांनी जतन करून ठेवला होता. हा फोटो पाहून नागराज मंजुळे भारावून जातात.