मालिकेतून निरोप घेतल्यानंतर मुक्ता बर्वे आता नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. सशक्त कलाकार असूनही अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. अर्थातच याला प्रेक्षकांच्या अपेक्षांपुढे वाहिनीचा टीआरपी कारणीभूत ठरला. मात्र मालिकेने निरोप घेताच आता मुक्ता बर्वे दोन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या समोर दाखल होत आहे. ‘वाय’ या आगामी चित्रपटात मुक्ता मुख्य भूमिकेत झळकत आहे. घाबरून मागे हटणारी ती नाही, कल्पनेपलीकडील वास्तवाची तीच्या लढ्याची गोष्ट’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या २४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटासोबतच मुक्ता बर्वे ‘व्हायरस पुणे सिजन २’ या ऑडिओ सिरीजमध्ये एका आव्हानात्मक भूमिकेत असणार आहे. ही ऑडिओ सिरीज स्टोरीटेल मराठी या ऍपवर पाहायला मिळणार आहे. ‘एका जिवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल?असे म्हणत मुक्ताने या सिरीजची झलक दाखवली आहे. निरंजन मेढेकर आणि डॅनियल ऑबर्ग लिखित यांनी या सिरीजची लिखाण केले आहे.
एका व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे हे संकट कोसळलेलं असतं. ह्या संकटातून नेहाला स्वतःची सुटका करून घ्यायची असते. पण नेहाच्या मुलीला किडनॅप केले आहे. नेहा मायराची सुटका कशी करते, लेकीला वाचवण्यासाठी कुठला मार्ग पत्करते याची ही कहाणी आहे. आपल्याकडे बंदुकांपेक्षाही मोठं हत्यार आहे, व्हायरसचं इन्फेक्शन होऊनही असिंपथेटिक राहिलेलं आपलं शरीर आहे. परंतु असे असूनही नेहा मायरापर्यंत पोहोचणार नाही हे तिला कळून चुकलेलं आहे. हा संघर्ष मुक्ता तिच्या आवाजाने सजग करताना दिसणार आहे. स्टोरीटेल मराठी ऍपवर ही सिरीज आज रिलीज केली जात आहे. तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देऊन ही सिरीज पाहणार असल्याचे कळवले आहे.