मृण्मयी देशपांडे सध्या आपल्या नील अँड मोमो हा व्यवसाय सांभाळण्यासाठी महाबळेश्वरला वास्तव्यास गेली आहे. इथे तिने आणि तिच्या नवऱ्याने मिळून शेतजमीन खरेदी केली होती. तिथे तिनं एक छानसं टुमदार असं फार्म हाऊस सुद्धा बांधलं आहे. या नवीन घराचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, निसर्गाच्या सानिध्यात ती आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फार्म हाऊसला थांबली आहे. या ठिकाणी नील अँड मोमो मार्फत नैसर्गिकरित्या बनवलेल्या साबणासाठी लागणारा कच्चा माल बनवला जातो. म्हणून मृण्मयी सध्या सेंद्रिय शेती कडेही वळलेली पाहायला मिळते. मात्र फार्म हाऊसमध्ये मृण्मयीला अनेक मजेशीर प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे.
मृण्मयीचे हे फार्म हाऊस डोंगर झाडींच्या गर्दीत वसलेले आहे. त्यामुळे काल रात्री मृण्मयीच्या घरात चक्क एक उंदीर शिरला होता. आता हा उंदीर घरात इतरत्र धावपळ करत असल्याचे पाहून त्याला बाहेर काढण्यासाठी मृण्मयीने एक शक्कल लढवली होती. घरातल्या गाद्या एकत्र गोळा करून तिने आणि मैत्रीण सोनिया गांधीने एक सुरक्षित भिंत तयार केली. जेणेकरून हा उंदीर पुन्हा घरात इतरत्र फिरत राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडेल. उंदराला सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी या दोघींनी मात्र अतिशय चोख बजावलेली पाहायला मिळत आहे. त्यासाठी सैनिक बनून ह्या दोघी एका हाताने गाद्यांना पकडून उभ्या आहेत तर दुसऱ्या हातात झाडू, काठी घेऊन उंदराला बाहेर जाण्याचा मार्ग दाखवत आहेत. उंदराला सुरक्षित रित्या बाहेर पडण्यासाठीचा मार्ग असे म्हणत मृण्मयीने एक फोटो शेअर केला आहे.
दोघीही आपली करामत पाहून जोरजोरात हसत सुद्धा आहेत. मृण्मयीची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. उंदराला सुरक्षित रित्या बाहेर पडण्यासाठीचा मार्ग, सोबत तो इकडे तिकडे भटकू नये म्हणून सैनिक तैनात! असं आहे महाबळेश्वरचं आयुष्य! हे कॅप्शन पाहून मात्र तिच्या अनेक चाहत्यांना आपलं हसू आवरणे कठीण झालं आहे. या प्रसंगावर अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील तिला मिळाल्या आहेत. मृण्मयी आणि तीची बहीण गौतमी यांचे अनेक मजेशीर रिल्स त्यांच्या चाहत्यांनी पाहिले आहेत. या दोघी बहिणी सतत एकमेकांची छेड काढतात. ह्या त्रासाला कंटाळून त्यांनी एक रील बनवला होता. तू मला त्रास देणं बंद कर, मी तुझ्याशी नीट वागेन. तू माझ्याशी नीट वाग, मी त्रास देणं बंद करेन. त्यामुळे दोघी बहिणींची गत टॉम अँड जेरी सारखी आहे, हे आता चाहत्यांनाही चांगलीच परिचयाची झाले आहे.