पुणे फेस्टिव्हल अंतर्गत विविध कार्यक्रम राबविले जातात पुणेकरांना या सोहळ्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. यंदाच्या वर्षी ३४ वा सोहळा मोठया दिमाखात पार पडला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध सौंदर्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे या सोहळ्याची चर्चा दरवर्षी पाहायला मिळते. मंगळवारी ‘यादें लता’ या कार्यक्रमातून स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या गाण्यांची मैफिल रंगली होती. मंगळागौरीचे खेळ, नृत्य स्पर्धा, मिसेस पुणे सौंदर्य स्पर्धा, केरळ महोत्सव, हास्यधारा अशा कार्यक्रमाने पुणे फेस्टिव्हलमधील ह्या वर्षीचा सोहळा अधिक रंगतदार बनला.
देशभरात अल्पावधीतच नावारूपास आलेल्या पुणे फेस्टिव्हल मधील ‘मिस पुणे’ आणि ‘मिसेस पुणे’ या सौंदर्य स्पर्धेचीही तेवढीच चर्चा रंगते. साक्षी पाटील हिने यंदाचा मिस पुणे बनण्याचा मान पटकावला आहे. तर मिसेस पुणेचा मान अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिने पटकावला आहे. झी मराठीवरील सत्यवान सावित्री या मालिकेत वेदांगीने प्रमुख भूमिका साकारली होती. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर वेदांगीने पुणे फेस्टिव्हलमध्ये आयोजित केलेल्या मिसेस पुणे या सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला. अभिनेता निखिल चव्हाणच्या हस्ते वेदांगिला हा पुरस्कार देण्यात आला. गेल्या वर्षी वेदांगी अभिषेक तिळगूळकर सोबत विवाहबद्ध झाली होती. नृत्याची विशेष आवड असलेल्या वेदांगीने डान्स महाराष्ट्र डान्स या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
वेदांगी अभिनयासोबतच स्वतःचे नृत्याचे क्लासेस चालवते. सूर राहू दे, कुसुम, लाडाची मी लेक गं, सत्यवान सावित्री या मालिकांमधून वेदांगी झळकली आहे. वेदांगी कुलकर्णी ही मूळची मुंबईची डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. वेदांगी मुंबईत “व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी” चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्टार प्रवाह वरील “साथ दे तू मला” या मालिकेतून प्राजक्ताची प्रमुख भूमिका तिने साकारली होती. याशिवाय झी युवा वरील ‘सूर राहू दे’ मालिकाही तीने अभिनित केली आहे. लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटक तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली. मिसेस पुणे २०२२ चा मान पटकावल्याबद्दल वेदांगीचे विशेष अभिनंदन.