स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसुबाई यांची मुत्सद्दी आणि तितकीच निर्भिड भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने साकारली. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. स्वराज्याचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनासोबतच महाराणी येसुबाई यांच्या आयुष्यातील अपरिचित माहिती लोकांपर्यंत पोहोचली.
करिअरच्या सुरुवातीलाच तिने अभिनयाची छाप पडली असून तिचा चाहता वर्ग देखील यामुळे तयार झाला. नांदा सौख्यभरे, संत तुकाराम यामधील विविधांगी अभिनय प्राजक्ताने लीलया रंगविला. या मालिकेनंतर आई माझी काळुबाई या मालिकेमध्येही ती झळकली आहे. रुपेरी पडद्यावरील अभिनय आणि पारंपरिक मराठी वेशभूषा यांच्या लोकप्रियतेमुळे ती घराघरांत पोहोचली, मराठमोळी प्राजक्ता सोशल मीडियावरही फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून खूपच सक्रिय असते. एका अनोख्या लूक मधून साजणी या गाण्याच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्राजक्ता आणि सिद्धांत तुपे यांची ही जोडी खूपच उठून दिसत आहे. गेस्ट अपिरसन्स असलेला प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले देखील या व्हिडीओच्या माध्यमातून पहिल्यांदाच गाण्यात पाहायला मिळत आहे.
S4G प्रोडक्शन द्वारे संदीप कुंजीर, शिवाजी जावळे, गजानन सानप आणि संदेश भोंडवे यांनी निर्मिती केली आहे. धैर्यशील घुले यांनी हे गाणे गायले असून तेजस घुले यांनी संगीताची साथ दिली आहे, बाळा कांबळे यांनी या गाण्याचे बोल रचले आहेत. पुण्याच्या लोणी काळभोर येथील प्रसिद्ध एमआयटी कॉलेज येथे या गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. तरुण वर्गाकडून यूट्युब वरील या गाण्याची खूप प्रशंसा केली जात असून तुम्हाला हे गाणे कसे वाटले हे नक्की कळवा.