स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेला मराठी मालिका सृष्टीत प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती मिळाली आहे. मालिकेतील अनिरुद्ध देशमुख हे पात्र विरोधी भूमिका दर्शवत असले तरी मिलिंद गवळी यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुकच केले आहे. मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत आजवर मिलिंद गवळी यांनी नायक आणि चरित्र भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रेक्षकांचे भयंकर प्रेम आहे. आणि म्हणूनच त्यांची विरोधी भूमिका देखील प्रेक्षकांनी आपलीशी केली आहे. कुठल्याही कार्यक्रमात मिलिंद गवळी यांना आमंत्रित केले असता उपस्थितांनी त्यांच्या अभिनयाला दाद मिळवून दिली आहे.
राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात घराणेशाही पाहायला मिळत असली तरी काही मराठी कलाकार याला अपवाद ठरली आहेत. मिलिंद गवळी यांची लेक मिथिला दिसायला सुंदर असूनही अभिनय क्षेत्रात येण्याचे तिने टाळले. मिथिला दिग्विजय कदम सोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर मिथिलाने आपल्या नृत्याची आवड जोपासत नृत्याचे क्लासेस सुरू केले आहेत. याशिवाय ती एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. अर्थात तीने हे वेगळं क्षेत्र निवडल्याचा अभिमान मिलिंद यांना आहेच. आपल्या लाडक्या लेकीच्या कौतुकात त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, होय मी स्वतःला एक अभिमानी पिता मानतो. कारण कोणता व्यवसाय निवडायचा या प्रश्नावर माझ्या मुलीचे उत्तर होते “फिटनेस ट्रेनर”.
जेव्हा मिथिलाने हा व्यवसाय स्वीकारला तेव्हा मला खरोखरच आश्चर्य वाटले. तिच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने तिने मला अधिकाधिक आश्चर्यचकित केले. तिची कामाप्रती उत्साही, समर्पित आणि मेहनती भावना पाहून खरंच अभिमान वाटतो. माझ्या घरातच माझे प्रेरणास्थान असल्याने बाहेर शोधण्याची गरज नाही. दोन पिढ्यांकडून ही प्रेरणा मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे. माझी भूतकाळातील पिढी म्हणजे माझे वडील श्रीराम गवळी अजूनही माझ्यापेक्षा जास्त मेहनत करतात. आणि माझी पुढची पिढी म्हणजे माझी मुले मिथिला आणि दिग्विजय हे स्वयंप्रेरित आहेत, मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. आणि प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या मुलांनो तुम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद.