सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत राजेश्वरी आणि मिहिरची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत राज्याध्यक्ष मॅडमच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री मीना नाईक झळकत आहेत. मीना नाईक या अभिनेत्री, लेखिका, पपेटीअर, समाजसेविका म्हणून चांगल्याच परिचयाच्या आहेत. १९७५ ते १९७९ च्या काळात दूरदर्शनवरील किलबिल कार्यक्रमात त्यांनी बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम सादर केले होते. पपेट्रीमध्ये जपान फाउंडेशन आणि भरत सरकारकडून त्यांनी दोन शिष्यवृत्ती मिळवल्या आहेत. लहान मुलांसाठी भारत व भारताबाहेर जागृती कार्यक्रम केले. संवेदनशील विषयावर त्यांनी लघुपट, ऍनिमेशन फिल्म्स बनवल्या.
मीना नाईक या पूर्वाश्रमीच्या मीना सुखटणकर. मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत सुखटणकर कुटुंब राहत होते. चार बहिणी, दोन भाऊ, आईवडील असा त्यांचा परिवार. ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे आणि दिवंगत अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या भगिनी. १९५१ सालच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात या दोघी बहिणींनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सह दिग्दर्शक राजा नवाथे यांच्यासोबत चित्रा नवाथे यांनी संसार थाटला. तर रेखा कामत यांचे ११ जानेवारी २०२२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. एका लग्नाची दुसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकेतून त्यांनी माईंची भूमिका साकारली होती. प्रसिद्ध अभिनेत्री निर्माती आणि दिग्दर्शिका मनवा नाईक ही मीना नाईक यांनी मुलगी. कलेचा वारसा घरातूनच लाभलेल्या मनवा नाईकने मराठी चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
आभाळमाया या लोकप्रिय मालिकेतून मनवा झळकली होती. पुढे हिंदी सृष्टीतही मनवाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन तिने निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्राकडे आपली पावले वळवली. बॉस माझी लाडाची या मालिकेच्या निर्मितीची ती धुरा सांभाळत आहे. याच मालिकेत मीना नाईक राज्याध्यक्ष मॅडम ही महत्वाची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे एकाच मालिकेतून या दोघी मायलेकी निर्माती आणि अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तुमची मुलगी काय करते या मालिकेतून मनवाने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलेले पाहायला मिळाले. डॉ निलांजना वर्मा हे पात्र ती या मालिकेत साकारताना दिसत आहे. निलांजनाच्या एंट्रीने मालिकेत ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे.