नुसती नोकरी करता यावी म्हणून पोरं शिकवायची नाहीत, त्या शिक्षणातून माणूस घडला पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा बोजवारा दाखवणारी बदली ही आठ भागांची अनोखी वेबसिरीज प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. शहरातील शिक्षक ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो. ग्रामीण दुर्गम भागातील लोक शिक्षणाबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? शिक्षकाला कोणकोणत्या अडचणीना सामोरे जावे लागते, ते या वेबसिरीजमध्ये चित्रित करण्यात आले आहे. पाटील गुरुजींनी घेतलेले आव्हान पूर्ण होईल की नाही यावर सगळी कहाणी आधारित आहे.
मराठी शाळेच्या आठवणींत रमायला आवडतं, पण आपल्या मुलाचं भविष्य मराठी शाळेत घडावं असं किती पालकांना वाटतं? इंग्रजी शाळेसाठी पालकांचा आग्रह आणि मराठी बद्दलची अनास्था पेक्षकांना विचार करायला भाग पाडते. शहरात शिक्षक असणाऱ्या पाटील गुरुजींची बदली साताऱ्यातील मरडवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेवर होते. एकंदरीत शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असताना पालक आणि मुलांची फरफट उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ दोन विद्यार्थ्यांपासून केलेली सुरुवात, पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे अशी धडपड. तसेच त्यांच्या व्यथा समर्पक रित्या दाखवल्या आहेत. प्राथमिक शिक्षणाची बोंब असताना, मुलांना आधुनिक युगातील गोष्टींची जाणीव करू देण्याचा गुरुजींची धडपड पहायला मिळते.
बदली या वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले असून निर्मिती मानसी सोनटक्के यांनी केली आहे. या मालिकेची कथा पटकथा आणि सवांद नितीन पवार आणि छायांकन वीरधवल पाटील यांनी केलं आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील तर समीर पठाण यांचे बोल लाभले आहेत. तर सह दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे. ८ भागांची बदली ही मराठी वेबसिरीज तुम्हाला प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. मराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता, मराठी कलाकाराचं हक्काचं व्यासपीठ अशी ओळख प्लॅनेट मराठीची आहे. मराठी प्रेक्षक म्हणून मराठी कलाकारांच्या मेहनती मधील बदली प्लॅनेट मराठीवर नक्की पहा.