एके काळी मराठी सृष्टीतील स्त्री भूमिकेतील खलनायकी चेहरा म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री “दया डोंगरे” यांच्याकडे पाहिले जायचे. मुळात आई ‘यमुताई मोडक’ या नाट्यअभिनेत्री, आत्या ‘शांता मोडक’ या अभिनेत्री आणि गायिका तर पणजोबा कीर्तनकार त्यामुळे कलेचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला.
११ मार्च १९४० रोजी जन्मलेल्या दया डोंगरे यांना गायन क्षेत्रात जाण्याची ईच्छा होती त्यासाठी शास्त्रीय तसेच नाट्यसंगीताचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी गाणं सादर केलं होतं. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना गाणं मागे पडलं आणि पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग दर्शवला.
इथेच त्यांना अभिनयाची गोडी निर्माण झाली आणि ‘एनएसडी’ मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या दिल्लीला रवाना झाल्या. शिक्षण घेत असतानाच लवकरच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी देखील येऊन पडली. लग्नानंतर पती शरद डोंगरे यांची मात्र खंबीर साथ त्यांना मिळाली.
तुझी माझी जमली जोडी रे, गजरा, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून अशा विविध चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. यातून बहुतेकदा त्यांच्या वाट्याला खलनायिकेच्या भूमिका आल्या. खाष्ट आणि कजाग सासू त्यांनी त्यांच्या अभिनयाने इतकी चांगली रंगवली की मराठी सृष्टीतील ललिता पवारनंतरची खलनायिका कोण असे म्हटले तर ‘दया डोंगरे’ हेच उत्तर मिळू लागले.
खूप वर्षांपूर्वी दया डोंगरे यांनी अभिनयातून निवृत्ती स्वीकारली असली तरी आजही त्यांनी निभावलेल्या भूमिकांना मराठी प्रेक्षक विसरणे केवळ अशक्यच. त्यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन २०१९ साली नाट्य परिषदेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
आपले कलाकार समूहातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांना सुदृढ आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.