काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विजू माने यांनी मराठी चित्रपट सुरक्षित राहण्यावरून मुद्दा उठवला होता. अगोदर बॉलिवूड चित्रपटाची झळ मराठी चित्रपटाने सोसली आहे मात्र आता दक्षिणात्य चित्रपट लोकप्रिय होत असलेले पाहून हे चित्रपट मराठी चित्रपटासाठी फायर ठरू लागले आहेत असे संकेत विजू माने यांनी दिले होते. त्यामुळे मराठी कलाकारांनी सावध राहून वेळीच उपाययोजना आखणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले होते. मात्र आता खरोखरच मराठी चित्रपटांना कोणी वाली उरला नाही अशीच चिन्ह दिसू लागली आहेत. अक्षय वाघमारे याने जाहीर निषेध! म्हणत शेर शिवराज चित्रपटाला स्क्रिनिंग मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे.
हीच परिस्थिती चंद्रमुखी या चित्रपटासाठीही निर्माण होऊ शकते. चित्रपटगृह मालक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटासाठी स्क्रिनिंग राखून ठेवतात त्यामुळे मराठी चित्रपटांना स्क्रिनिंग मिळणे कठीण होऊ लागले आहे. याबाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता या कलाकारांनी केली आहे. अक्षय वाघमारे याची ही पोस्ट सोशल मीडियाने उचलून धरली आहे. अक्षय म्हणतो की, मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे. पण पुढे काहीच साध्य झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला.
फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा. नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत. आणि मराठी जनतेने उत्स्फुर्त पणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते. पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स.
सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात. आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील. सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे.