ज्येष्ठ अभीनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अल्पशा आजाराने मुंबईत त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सीमा देव यांना २०२० पासून अल्झायमर सारख्या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे या काळात त्या मिडियापासून आणि अभिनय क्षेत्रापासूनही दूर होत्या. गेल्या वर्षी २ फेब्रुवारी २०२२ रोजी रमेश देव यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टी हळहळली होती.
आता सीमा देव यांच्या जाण्यानेही मराठी सृष्टीत शोककळा पसरली आहे. रमेश देव आणि सीमा देव या एव्हरग्रीन जोडीने अनेक उत्तमोत्तम चित्रपट मराठी हिंदी सृष्टीला दिले आहेत. रमेश देव यांनी खलनायक जरी साकारले असले तरी बऱ्याचदा त्यांनी सीमा देव यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. दोन वेण्या, साधीशी राहणीमान अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सीमा देव या माहेरच्या नलिनी सराफ म्हणून ओळखल्या जातात. नलिनी सराफ यांना नृत्याची विशेष आवड होती. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी म्हणून त्यांनी चित्रपटातून नृत्य करण्यास सुरुवात केली होती. अशातच त्यांना अभिनयाचीही संधी मिळत गेली.
सुवासिनी, या सुखांनो या, आलिया भोगासी, पडछाया, हा माझा मार्ग एकला, मोलकरीण, रंगल्या रात्री अशा, पाहू रे किती वाट अशा चित्रपटातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. सीमा देव यांनी हिंदी चित्रपट सृष्टी देखील गाजवली होती. आनंद, प्रेम पत्र, मियाँ बीबी राजी, आंचल, हथकडी, मर्द अशा अनेक हिंदी चित्रपटात त्या सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. रमेश देव यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना अभिनय आणि अजिंक्य ही दोन अपत्ये झाली. ही दोन्ही मुलं आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेत असत. सून स्मिता आणि आरती याही त्यांचा सांभाळ करत होत्या. अल्झायमरमुळे सीमा देव यांना आपल्या कुटुंबालाही ओळखता येत नव्हते. अगदी रमेश देव यांनाही त्या ओळखत नव्हत्या ही खंत रमेश देव यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.