पदार्थात मीठ नसेल तर तो पदार्थ अळणी, बेचव मानला जातो. त्याचप्रमाणे चित्रपटात जर खलनायक नसेल तर चित्रपट पाहण्याची मज्जाच निघून जाते असे समीकरण एकेकाळी चित्रपटांमध्ये ठासून भरलेले होते. निळू फुले हे खलनायकाच्या भूमिकेतील मराठी सृष्टीतील बादशाह म्हटले तर त्यांच्या पाठोपाठ ही जागा कोणी घेतली असेल ती राजशेखर यांनी. गडहिंग्लजचा हा अवलिया अभिनय क्षेत्रात पाऊल टाकायच्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये दाखल झाला. आणि मराठी चित्रपटाचा एक खास चेहरा बनून गेला. भूतकर कुटुंबातील राजशेखर हे शेंडेफळ. जनार्दन भूतकर हे त्यांचं मूळ नाव. वडील टेलरिंगचा व्यवसाय सोबत नाटकातून काम करत.
ते पाहून आपणही या क्षेत्रात यावं अशी राजशेखर यांची प्रबळ ईच्छा होती. कोल्हापूरला आल्यावर नाना जोशींशी ओळख झाल्यावर त्यांच्या मदतीने प्रॉम्प्टरचे काम केले. गणपत पाटील दिग्दर्शित ऐका हो ऐका या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं. ऐन विशीत म्हाताऱ्याची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पुढे भालजी पेंढारकर यांनी आकाशगंगा चित्रपटात भूमिका दिली. मोहित्यांची मंजुळा, मराठा तेतुका मेळवावा या चित्रपटात त्यांनी खलनायक साकारला आणि इथेच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. बेरकी नजर, आवाजातील करारेपणा हा त्यांच्या खलनायकी अभिनयाचा प्लस पॉईंट ठरला. थांब लक्ष्मी कुंकू लावते, पाठलाग, प्रतिकार, ठकास महाठक असे मराठी चित्रपट त्यांनी गाजवले.
तसेच सासूची माया, लाथ मारिन तिथे पाणी, सत्त्वपरीक्षा, दागिणा, थोडा तुम बदला थोडा हम अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. चित्रपटातून खलनायक रंगवलेला हा कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र सामाजिक बांधिलकी जपताना दिसला. ‘मातोश्री’ या नावाने त्यांनी कोल्हापुरात वृद्धाश्रमाची स्थापना केली. त्यांच्या पश्चात या वृद्धाश्रमाची देखभाल त्यांच्या पत्नी सांभाळतात. राजशेखर यांना दम्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. २५ डिसेंबर २००५ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. राजशेखर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा मुलगा स्वप्नील राजशेखर पुढे चालवत आहेत.
वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून स्वप्नील राजशेखर यांनी विविधांगी भूमिका साकारून आपल्या सजग अभिनयाची पावती दिली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी, टाकटक २, आभाळाची माया, स्वराज्यजननी जिजामाता, एकच प्याला, राजा शिवछत्रपती, माणूस एक माती अशा चित्रपट, मालिका आणि नाटकातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले आहेत. राजशेखर यांची नात आणि स्वप्नील राजशेखर यांची कन्या कृष्णा राजशेखर ही देखील अभिनेत्री आहे. हिमालयाची सावली, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, छुपे रुस्तम, गावातलं वारकरी अशा नाटक, मालिका आणि व्हिडीओ सॉंग मधून कृष्णा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.