टीआरपीच्या स्पर्धेत येण्यासाठी बहुतेक सर्वच वाहिन्या आपल्या बाजूने नाविन्यपूर्ण कथानकाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. अशातच सन मराठी ही वाहिनी गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सक्षम झालेली पाहायला मिळते. या वाहिनीवर विविध धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मालिकांतील कलाकारांनी केलेले उत्कृष्ट सादरीकरण हि जमेची बाजू म्हणावी लागेल. त्यातीलच एक म्हणजे संत गजानन शेगावीचे ही अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका आता अनेक वर्षांचा लीप घेणार आहे. त्यामुळे प्रमुख पात्र साकारणाऱ्या नायकाची यातून एक्झिट झाली आहे.
अमित फाटक याने मालिकेत गजानन महाराजांची भूमिका साकारली होती. मालिकेला निरोप देताना अमित फाटक खूपच भावुक झालेला पाहायला मिळाला. आतापर्यंत अमितने सहाय्यक भूमिकांनी प्रेक्षकांपर्यंत ओळख बनवली होती. मात्र ही भूमिका त्याच्या कारकिर्दीला वेगळी कलाटणी देणारी ठरली. या मालिकेमुळे अमितने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली. गजानन महाराजांच्या भक्तांकडून मिळालेल्या आदर सत्कारामुळे तो खूपच भारावून गेला होता. त्यामुळे मालिका सोडताना तो भावुक झाला होता. आपल्याकडून अनावधानाने काही चुका झाल्या असतील प्रेक्षकांनी त्या माफ कराव्यात अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली. तर ही मालिका लीप घेणार असल्याने ही भूमिका आता ज्येष्ठ अभिनेते मनोज कोल्हाटकर निभावताना दिसणार आहेत.
मनोज कोल्हटकर यांनी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवीच्या बाबांच्या भूमिकेमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. फुलपाखरू, मेरे साई, सावित्रीजोती, यह है जिंदगी, देवोंके देव महादेव, सिद्धिविनायक महिमा, सानेगुरुजी मीत अशा हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातूनही त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका बजावल्या आहेत. मनोज कोल्हटकर यांनी साकारलेल्या ऐतिहासिक मालिकांमधील भूमिका देखील तितक्याच गाजल्या आहेत. संत गजानन महाराजांची भूमिका साकारणे हे मनोज कोल्हटकर यांच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट ठरली आहे. आपल्याला ही प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने ते या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहेत.