मन झालं बाजींद या झी मराठीवरील मालिकेत भाऊसाहेब विधाते ही रायाच्या वडिलांची भूमिका मालिकेच्या नायक आणि नायिका इतकीच सशक्त वाटते. रायाला आणि त्याच्या आईला वेळोवेळी खडसावणारे आणि कृष्णा सारख्या सुनेवर लेकीप्रमाणे माया करणारे, भाऊसाहेब विधाते ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. घुली मावशीचा डाव उधळून लावण्याचे काम भाऊसाहेब विधाते यांनी वेळोवेळी केलेले आहे. त्यामुळे त्यांचा दरारा मालिकेतून अनुभवण्यास मिळतो. ही भूमिका साकारली आहे अभिनेते राजेश आहेर यांनी. राजेश आहेर यांचा विविध क्षेत्रात हातखंडा आहे. त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात.
अभिनेते राजेश आहेर हे व्यवसायाने होमिओपॅथी डॉक्टर आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर काही काळ त्यांनी ही सेवा पुरवली होती. मधल्या दोन वर्षांच्या कठीण काळातही त्यांनी ही सेवा चालू ठेवली होती हे विशेष. राजेश आहेर हे केवळ अभिनेतेच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनही ओळखले जातात. याशिवाय गेल्या ७ वर्षांहून अधिक काळापासून ते रेडिओ विश्वास ९०.८ एफएम वर बाळू नावाने रेडिओ टॉक शो तसेच टेडीओ जॉकी म्हणूनही भूमिका बजावताना दिसतात. रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या राजेश आहेर यांनी हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपट आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे. पानिपत, फ्रीकी अली अशा हिंदी चित्रपटातून मोठमोठ्या कलाकारांसोबत त्यांना अभिनयाची संधी मिळाली.
२००८ साली वस्त्रहरण हे नाटक त्यांनी पहिल्यांदा अभिनित केलं. धिप्पाड शरीरयष्टी मुळे त्यांना या नाटकात बलाढ्य भीमची भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली. नटसम्राट या एकपात्री प्रयोगाचे दिग्दर्शन आणि सादरीकरण स्वतः राजेश आहेर यांनी केलं होतं. हे नाटक मराठी तसेच हिंदी भाषेतून करण्यात आलं. मारे गए गुलफाम या हिंदी नाटकातूनही त्यांनी रंगमंच गाजवलेला पाहायला मिळाला. झी मराठीवरील बाजी या मालिकेत त्यांनी दादाजी हे पात्र साकारले होते. लक्ष्य, स्वामिनी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, प्रेमाचा गेम सेम टू सेम या मालिका तसेच फत्तेशिकस्त, बोनस या चित्रपटातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले.
फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांना बाजीप्रभू देशपांडे ही दमदार व्यक्तिरेखा मिळाली आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाने ती सुरेख बजावलेली पाहायला मिळाली. एका हिंदी वेबसिरीज साठी राजेश आहेर यांनी खूप मेहनत घेऊन तब्बल ४० किलो वजन कमी केले होते. मन झालं बाजींद या मालिकेत देखील असेच एक दमदार पात्र त्यांच्या वाट्याला आलं आहे. भाऊसाहेब विधाते या भूमिकेने राजेश आहेर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. घुली मावशीच्या कटकारस्थानांवर वचप बसवण्यासाठी भाऊसाहेबांचा धाक तितकाच गरजेचा आहे. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना हवेहवेसे आहे. या भूमिकेसाठी राजेश आहेर यांचे अभिनंदन आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.