सोनी मराठी वाहिनीवर गुरुवारपासून पोस्ट ऑफिस उघडं आहे ही नवीन मालिका प्रसारित झाली आहे. काल या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. वनिता खरात, ईशा डे, संदेश उपशाम, शिवाली परब, प्रभाकर मोरे, दत्तू मोरे. अरुण कदम, पृथ्वीक प्रताप अशी हास्यजत्राची कलाकार मंडळी या मालिकेतून हलकी फुलकी कॉमेडी करताना दिसली. त्यामुळे या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला अशी प्रतिक्रिया देण्यात आली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मकरंद अनासपुरे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसले आहेत.
दे धक्का २ या चित्रपटानंतर मकरंद अनासपुरे यांनी पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. सुरुवातीच्या काळात मराठी सृष्टीत येण्यासाठी मकरंद अनासपुरे यांनी धडपड केली होती. त्यावेळी भूमिकेचे लांबी रुंदी न मोजता मिळेल त्या भूमिका त्यांनी अभिनयाने गाजवल्या होत्या. त्यांची संवाद फेकण्याची स्टाईल, विनोदाचे अचूक टायमिंग प्रेक्षकांना खूप आवडले. आणि म्हणूनच चित्रपट चालला किंवा नाही चालला तरी मकरंद अनासपुरे त्यांच्या विनोदी शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विभागातून पदवी घेतल्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर अनेक कलाकारांनी चित्रपटात काम मिळवण्यासाठी धडपड केली, हा स्ट्रगल मकरंद अनासपुरे यांना देखील चुकलेला नव्हता.
खिश्यात फक्त ५०० रुपये घेऊन ते मुंबईत दाखल झाले होते. इथे आल्यावर काम शोधण्यासाठी, नाटकाच्या प्रयोगाला जाण्यासाठी जवळ पुरेसे पैसे नसायचे. त्यावेळी विनातिकिट ट्रेनने प्रवास करत, कमरेचा बेल्ट हातात घेऊन त्या जोडीदाराच्या मागे शिव्या देत धावत जायचे. जेणेकरून काहीतरी भांडण झालंय असे टीसीला भासवायचे. शुभमंगल सावधान चित्रपटातून त्यांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकले. वास्तव, यशवंत, वजुद अशा हिंदी चित्रपटात त्यांच्या वाट्याला छोट्या पण तेवढ्याच महत्वपूर्ण भूमिका आल्या. ऊन पाऊस, बेधुंद मनाच्या लहरी अशा मालिकांमधून ते छोट्या पडद्यावर झळकले. महाराष्ट्राची हास्यजत्राचे त्यांनी परीक्षक म्हणून काम केले, मात्र चित्रपटाकडून ते आता पुन्हा मालिका क्षेत्रात पुनरागमन करत आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे.