बालकलाकार ते अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि मालिका निर्माता म्हणून महेश कोठारे यांनी यशाचा एकेक टप्पा सर करत मराठी सृष्टीत स्वतःचं प्रस्थ निर्माण केलं आहे. छोटा जवान, राजा और रंक मधुन बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. पुढे जाऊन मराठी चित्रपटातून नायकाच्या तर कधी सहाय्यक भूमिका साकारल्या. मात्र त्यानंतर दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आणि लक्ष्मीकांत बेर्डेला आपल्या चित्रपटाचा खरा नायक बनवले. त्यांचा हाच दिलदारपणा प्रेक्षकांना देखील भावला, म्हणूनच आपल्या यशाच्या प्रवासात अनेक चढउतार अनुभवणाऱ्या महेशजींनी आपले आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला.
महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलेले चित्रपट तसेच मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. या धडाकेबाज कलाकाराच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रेक्षकांना जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. त्यांच्या आत्मचरितातून ही माहिती उपलब्ध होत असल्याने, आत्मचरित्राचे सगळ्यांनी स्वागत केले आहे. डॅम इट आणि बरंच काही आत्मचरित्रात महेश कोठारे यांच्या आयुष्याचा लेखाजोखा प्रेक्षकांना पुस्तकरूपाने अनुभवायला मिळणार आहे. आयुष्याच्या प्रवासात कौटुंबिय जबाबदारी, अनेक मानअपमान सोसणारे चटके, मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ. चित्रपट निर्मितीमधून मिळालेले अनपेक्षित वळण. सहा दशकात संपर्कात आलेले कलाकार, एवढेच नाही तर लाडक्या लक्ष्यासोबतच्या गोड आठवणींना दिलेला उजाळा पाहायला मिळणार आहे.
महेश आत्मचरित्र येत्या ११ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. महेश कोठारे यांचे हे आत्मचरित्र वाचण्याची अनेकांनी ईच्छा व्यक्त केली आहे, तर काहींनी प्रिबुकिंग सुद्धा केलेली आहे. पुस्तकाबद्दल महेश कोठारे म्हणतात की, एक अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, लेखक या नात्याने माझ्या जीवन प्रवासाचा लिखित पट तुमच्यासमोर आणताना मला खूप आनंद होतोय. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एक मुलगा, एक पती, एक पिता आणि एक विश्वासू या नात्याने एक कुटुंब म्हणून जेव्हा आपण एकत्र उभे राहू शकतो, तेव्हा अडथळ्यात आलेल्या पर्वतालाही हलविण्याचे सामर्थ्य तुमच्यात येते. मी तुमच्यासमोर माझा हा सर्व प्रवास मांडत आहे माझ्या आत्मचरित्रातुन डॅम इट आणि बरंच काही.