महाराष्ट्राची हास्यजत्रा या तुमच्या लाडक्या शोमध्ये लवकरच छोट्या हास्यविरांची एन्ट्री होत आहे. सोमवार ते गुरुवार या शोमध्ये हे हास्यवीर तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रचंड प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. आपला रोजचा कामाचा थकवा आणि मानसिक ताण दूर करण्याचे काम हास्यजत्रेच्या कलाकारांनी केले आहे. या शोमधून बऱ्याचशा जाणकार कलाकारांनी एक्झिट घेतली असली तरी, शोवरील प्रेक्षकांचे प्रेम तसूभर देखील कमी झालेले नाही. कारण या शोमुळे सर्वांचे निखळ मनोरंजन झाले आहे, याचे दाखले अनेकदा कलाकारांना मिळालेले आहेत.
शो सोडून जाणाऱ्या कलाकारांची उणीव भरून काढण्यासाठी, महाराष्ट्रातील तमाम छोट्या हास्य वीरांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रा छोटे हास्यवीर या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांनी विनोदाचे सादरीकरण करणारे व्हिडीओ अपलोड केले होते. त्यातूनच आता चार सर्वोत्कृष्ट बालकलाकारांची निवड करण्यात आली आहे. हजारो जण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खूपच उत्सुक होते. आता चार हास्य विरांची निवड करण्यात आल्याने हे हास्यवीर आता तुम्हाला छोट्या पडद्यावरून भेटायला येत आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. देवदत्त घोणे हा चिमुरडा चौथी इयत्तेत शिकत आहे. देवदत्त हा साताऱ्यात वास्तव्यास आहे. स्पर्धेचा दुसरा विजेता आहे साईराज शिंदे. साईराज हा बोरिवली येथील रहिवासी असून तो सध्या दुसरी इयत्तेत शिकत आहे.
ओवी पवार ही स्पर्धक सर्वात लहान स्पर्धक असून ती अवघ्या ६ वर्षांची आहे. ओवीचा व्हिडीओ मजेशीर असल्याने ती या स्पर्धेत विजेती ठरली आहे. ओवी कल्याणमध्ये राहत असून ती सध्या पहिली इयत्तेत शिकत आहे. ठाण्यातील सुमेधा चौधरी ही इयत्ता सातवीत शिकत आहे. सुमेधाला अभिनयाची आवड असल्याने तिने या स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. हे चारही स्पर्धक आता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, त्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सेटवरील कलाकार मंडळी सुद्धा या चिमुरड्याना हसतं खेळतं ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत; जेणेकरून सेटवर ते बिनधास्तपणे वावरताना दिसतील. या चारही स्पर्धकांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.