सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. गेली साडेतीन वर्षे या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे मात्र आता या शोने ब्रेक घेतला असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काळात मोठमोठाली संकट समोर उभी असताना प्रत्येकजण कुठेतरी विरंगुळ्याचे साधन शोधत होते. याच काळात महाराष्ट्राची हास्यजत्रा प्रेक्षकांना दिलासा देत पुरेपूर मनोरंजन करताना दिसली होती. फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, नम्रता संभेरावने साकारलेली लॉली. चांदणी कपूर ओंकार भोजनेचा अगं अगं आई, पृथ्वीक प्रताप विक्रोळीचा शाहरुख असे अनेक कॅरॅक्टर या कलाकारांनी रंगवलेले पाहायला मिळाले.

केवळ मराठी प्रेक्षक नाही तर परराज्यातील प्रेक्षकांना देखील या कलाकारांनी भुरळ पाडली आहे. ही कलाकार मंडळी जेव्हा कुठे बाहेरगावी प्रेक्षकांना भेटतात त्यातील बहुतेक प्रेक्षक हे परप्रांतीय असतात. आणि आम्ही तुमचा शो आवडीने पाहतो हे ते आवर्जून सांगताना दिसतात. त्यामुळे मराठी भाषा सर्वदूर पसरवण्यात या कलाकारांचा देखील मोलाचा वाटा आहे असे म्हणावे लागेल. नुकतेच सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा शो सुरू करण्यात आला आहे. या शोने महाराष्ट्राची हास्यजत्राचा वेळ देखील घेतला आहे. त्यामुळे हास्यजत्रेला काही काळापुरता ब्रेक मिळाला आहे, परंतु यावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. प्रेक्षकांची ही नाराजी दूर करण्याचे काम दिगदर्शक निर्माते सचिन गोस्वामी यांनी केली आहे.

याबाबत सचिन सर म्हणतात की, प्रेक्षकांना हसवण्याचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून अविरतपणे चालू होते. परंतु विहिरीतून सतत पाणी उपसले तर त्यात पाणी जमा तर व्हायला पाहिजे. जर नवीन पाणी साचलं तरच त्याचा फायदा होईल. तुम्हाला हसवण्यासाठी अशाच नाविण्याच्या शोधासाठी हा ब्रेक महत्वाचा होता. पुढील काळात नवीन काहीतरी घेऊन आम्ही नक्की तूच्यासमोर येणार आहोत. असे आश्वासन सचिन गोस्वामी यांनी यावेळी दिलेले आहे. मालिकेतील कलाकार देखील नाविन्यपूर्ण गोष्टींच्या शोधात आहेत. त्यासाठी हा ब्रेक खूप गरजेचा होता असे यातील सर्वच कलाकारांनी सहमती दर्शवली.
या छोट्याश्या विश्रांतीमुळे आम्ही ह्या मंचाला नक्कीच मिस करणार आहोत. तर सहकलाकारांनाही खूप मिस करु असे भावनिक होऊन कलाकारांनी एकमेकांना तात्पुरता निरोप दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळणार अशी आशा आहे. साई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी तसेच मालिकेतील सर्वच सहकलाकारांना प्रेक्षक नक्कीच मिस करतील. तसेच पुढील पर्वात नेहमीप्रमाणे धम्माल मस्तीच्या स्किट प्रेक्षकांना पहायला मिळतील अशी आशा वाटते.