प्रदीप वेलणकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी मधुरा वेलणकर हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. अखंड सौभ्याग्यवती, हापूस, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनवास, खबरदार. गिलटी, गुमनाम है कोई, गोजिरी, जन गण मन,नॉट ओन्ली मिसेस राऊत,पाऊलवाट अशा मालिका आणि चित्रपटातून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम सोबत तिने लग्नगाठ बांधली. या दोघांचा हा प्रेमविवाह आहे. पण पहिल्याच भेटीत मधुराने अभिजीतला नकार दिलेला होता. त्यांची ही हटके लव्हस्टोरी नेमकी कशी होती हे आज जाणून घेऊयात.
रुपारेल कॉलेजमध्ये असताना मधुरा आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेत होती. त्याच वर्षी अभिजीतने या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकावले होते. यातीलच एका नाटकात त्याने मधुराला पाहिले. आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर ही मुलगी कोण? याचा शोध घेण्यासाठी मित्र उमेश कामतला कामाला लावले. उमेश हा मधुराच्याच कॉलेजमध्ये सिनिअर होता. त्यामुळे मधुरा कोण आहे ती काय करते याची सगळी पार्श्वभूमी त्याने अभिजीतला कळवली. त्यावेळी मधुरा सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्याचे काम करत होती. शिवाजी साटम यांची मुलाखत घेण्याची तिला संधी मिळाली होती. तेव्हा तिने शिवाजी साटम यांची परवानगी मिळवली. मुलाखत झाल्यानंतर शिवाजी साटम यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनिरुद्धला काही कामानिमित्त भेटण्यास सांगितले.
अनिरुद्धने अभिजीतचे काहीतरी काम असून तुझा पेजर नंबर दादाला दे असे सांगितले. नाटकानिमित्त काहीतरी काम असेल असे समजून अभिजीतला नंबर पाठवला. या नंतर अभिजीतने मधुराला शिवाजी मंदिरला भेटायला बोलावले. पण अभिजित थेट मधुराच्या घरी गेला, तेव्हा अचानक त्याला समोर पाहून मधुराला राग आला. पण पुढे अभिजीतने मधुराला प्रपोज केले तेव्हा त्याला साफ नकार दिला. एक मैत्री म्हणून दोघांच्याही पुढे भेटीगाठी वाढू लागल्या. दरम्यान अभिजीतने पुन्हा एकदा धाडस करून मधुराला प्रपोज केले. इतके दिवस एकत्रित घालवल्यानंतर, त्याच्याशी छान मैत्री झाल्यानंतर अभिजीतचा स्वभाव तिला आवडू लागला होता. त्यामुळे नकार देण्यासाठी तिच्याकडे कुठलेच कारण नव्हते. अभिजीतच्या प्रेमाचा प्रस्ताव तिने स्वीकारला आणि घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न गाठ बांधण्याचा निर्णय घेतला.