अशी ही बनवाबनवी चित्रपटातला घोटाळा शब्द उच्चारतानाचा ‘घोss पण नाही ळाss पण नाही’.. हा डायलॉग आठवतो?. मी व्हीssनस कंपनीतून आलोय असे म्हणत हा अडखळत बोलणारा कलाकार सचिनला व्हीनस म्युजिक कंपनीत गाणं गाण्यासाठी साइन करायला येतो तेव्हाचा त्याचा हा डायलॉग. खरं तर आपल्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे हा कलाकार प्रेक्षकांना हसायला भाग पाडतो अशा या कलाकाराचे नाव आहे “मधू आपटे”.
१ मार्च १९१९ रोजी कोल्हापूर येथे मधू आपटे यांचा जन्म झाला. वडिलांच्या निधनानंतर आईनेच तीन मुलांचा सांभाळ केला. भावाच्या घरी राहून लोणची , पापड , जरीच्या टोप्या विकून त्या आपला प्रपंच सांभाळत होत्या अशातच मधू आपटे यांना वयाच्या ९ व्या वर्षी भयंकर ताप आला आणि या तापामुळेच त्यांची वाचा गेली . परंतु घशावर उपचार केल्यानंतर त्यांना अडखळत का होईना पण बोलता येऊ लागले. पुढे त्यांचे असे बोलणे मराठी सृष्टीत कमाल घडवून आणेल याचा कोणी विचारही केला नसावा. सुंदर हस्ताक्षर, शालेय अभ्यासात हुशार असे असूनही आर्थिक परिस्थिमुळे जेमतेम ५ वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. मामा प्रभात कंपनीत नोकरीला त्यांच्या ओळखीनेच मधू यांचे मोठे बंधू अनंत आपटे बालकलाकार म्हणून काम करत असत तिथेच पेंटिंग खात्यात मधू यांनाही काम मिळाले. वर्षभर शरीराला झेपेल तशी सर्व कष्टाची कामे त्यांनी केली.
शांताराम बापूंनी मधू यांचे बोलणे ऐकले होते त्यांनी संत तुकाराम चित्रपटात मधू त्यांना अभिनयाची संधी दिली. त्यानंतर नाटकांतून त्यांना भूमिका मिळाल्या मात्र कामात सातत्य नसल्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी त्यांना उंबरठे झिजवावे लागले. शेवटी सुलोचना दिदींबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. हिंदी सृष्टीत नाव कमावलेल्या सुलोचना दिदींसोबत मधू आपटे चित्रीकरण स्थळी जायचे अशातच त्यांना काही निर्मात्यांनी हिंदी चित्रपटातही छोट्या मोठ्या भूमिका दिल्या. डायलॉग बोलताना मधूजी कुठे अडकतील हे कोणालाच सांगणे कठीण मात्र त्यांच्या अशा बोलण्यानेच चित्रपट गृहात प्रेक्षकांचा अक्षरशः हशा पिकायचा.
त्यांच्या या शैलीमुळेच अनपढ, थरार, बाई मी भोळी, बाल शिवाजी, आत्मविश्वास, दागिना, सौभाग्य , गंमत जंमत, आप आये बहार आई अशा २०० हुन अधिक चित्रपटातून त्यांना अभिनयाची संधी मिळत गेली. विनोदाचे अचूक टायमिंग हेरून सचिन पिळगावकर यांनी आपल्या बहुतेक सर्वच चित्रपटातून मधू आपटे यांना अभिनयाची संधी दिली होती. मात्र अखेर १३ मार्च १९९३ रोजी या हरहुन्नरी कलाकाराने वयाच्या ७५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. चार्ली चॅप्लिन, बालगंधर्व, नानासाहेब फाटक अशा मातब्बर कलाकारांविषयी त्यांना अत्यंत आदर होता. सुलोचना दीदींनी मधू आपटेना शेवटपर्यंत सांभाळले होते हे विशेष.