नितळ सौंदर्याचा आणि खास करून बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा साबण अशी भारतात लक्स साबणाची ओळख आहे. बॉलिवूड सृष्टीतील मधुबाला, मीना कुमारी पासून ते माधुरी दीक्षित, जुही चावला आणि अगदी आताच्या दीपिका पदुकोण, आलिया भट्ट पर्यंत या साबणाच्या जाहिरातीत अभिनेत्रींनी काम केले आहे. परंतु या सर्वांच्या अगोदर भारतात सर्वप्रथम लक्सच्या जाहिरातीत झळकण्याचा मान एका मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाला आहे. १९४१ साली लक्सच्या जाहिरातीत पहिल्यांदा लीला चिटणीस झळकल्या होत्या. आज १४ जुलै लीला चिटणीस यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी आज जाणून घेऊयात. लीला चिटणीस या पूर्वाश्रमीच्या लीला नगरकर. १९१२ साली धारवाड येथे त्यांचा एका सुशिक्षित कुटुंबात जन्म झाला.
वडील शिक्षक असल्याने आपल्या मुलीनेही चांगले शिकून मोठे व्हावे ही त्यांची इच्छा होती. मात्र वयाच्या १७ व्या वर्षीच डॉ गजानन चिटणीस यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. वयाच्या २२ व्या वर्षी त्या चार मुलांच्या आई झाल्या. घर संसाराला हातभार लागावा म्हणून बीएची पदवी मिळवल्यावर त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. मात्र ही तारेवरची कसरत करत असतानाच त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागले आणि पतीपासून त्या वेगळ्या झाल्या. नाटकातून काम करत असताना त्यांना चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. बंधन, कंगन, आज की बात, दुलहन एक रात की, पूजा के फुल, काला बाजार, असली नकली. मनमौजी, पाहू रे किती वाट प्रेम आंधळं असतं, एक होता राजा अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
४० च्या दशकात एक आघाडीची नायिका अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. याचमुळे त्यांना १९४१ साली लक्सच्या जाहिरातीत झळकण्याचा मान मिळाला. पुढे १९५० नंतर त्यांनी चित्रपटातून दिलीप कुमार, देवानंद, धर्मेंद्र, सुनील दत्त, राजेश खन्ना अशा गाजलेल्या नायकाच्या आईच्या भूमिका साकारल्या. या प्रवासात मात्र त्यांना कायम एकाकीपण जाणवू लागला. चित्रपट सृष्टीतून काढता पाय घेऊन त्या अमेरिकेत गेल्या तिथे त्यांनी पाळणाघर चालवले मात्र त्या पुन्हा परतल्या. पुढे चित्रपटात काम करण्याचे आपले वय राहिले नाही याची जाणीव होताच त्यांनी १९८१ साली आयुष्याचे अनेक पैलू उलगडणारे ‘चंदेरी दुनियेत’ हे आत्मवृत्त लिहिले. पुढे पुन्हा त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आणि १४ जुलै २००३ रोजी या जगाचा निरोप घेतला.