लावणीसम्राज्ञी विजया पालव यांना ठाण्यातील इमारतीमध्ये महिलांच्या दोन गटात झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आहे. विजया पालव या राज्यपुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आजवर अनेक मंचावरून आपल्या नृत्याची अदाकारी दाखवून दिली आहे. नुकतेच पनवेल येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी उभारलेल्या रिक्षा थांब्याला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून एक सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी विजया पालव यांनी देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती. काल रविवारी विजया पालव यांच्यावर काही महिलांनी हल्ला चढवला होता. दिवा पश्चिम या भागात सोनू प्लाझा या इमारतीत साधारण चार वर्षांपूर्वी त्यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता.
गेल्या काही वर्षांपासून मेंटेनन्सचा खर्च इमारतीतील राहिवाश्यांकडून घेऊन बिल्डरकडे एकत्रित जमा करण्यात येत होता. इमारतीत राहणारे रहिवासी बिल्डरकडे महिन्याला ८०० रुपये मेंटेनन्सची रक्कम जमा करत होते. मात्र यावेळी ८०० रुपयांऐवजी १५०० रुपये मेंटेनन्सचा खर्च राहिवाश्यांकडून घेण्यात आल्यामुळे आणि अधिकचा मेंटेनन्स वाढवल्याने याचा जाब विचारण्यासाठी सदर इमारतीतील महिलांनी बिल्डरकडे धाव घेतली होती. विजया पालव यादेखील या तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांसोबत बिल्डरकडे जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. ही घटना रविवारी घडली त्यावेळी बिल्डरकडून काही महिलांनी या तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान विजया पालव यांनी आपल्या घरात बिल्डरला न विचारता वाढीव काम करून घेतले होते.
कोणाला विचारून तुम्ही घरात वाढीव काम केलं? असा उलट प्रश्न बिल्डरकडून विचारण्यात आल्याने हा वाद आणखीनच चिघळत गेला. या मारहामारीत विजया पालव यांना देखील मारहाण झाल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. या मारहाणीनंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विजया पालव यांना उपचारासाठी दाखल केले होते. घटनेची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याला कळवली मात्र रविवारी रात्रीपर्यंत मारहाण झालेली तक्रार दाखल केली नसल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. अखेर बिल्डरविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात कायदेशीररित्या तक्रार दाखल केल्यावरच चौकशीचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.