दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी काही तरी नावीन्य पूर्ण गोष्टी घेऊन येत असतात. अशात लवकरच महेश मांजरेकर यांचा एक अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयीची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया मार्फत दिली आहे. बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वात महेश मांजरेकर आपल्याला एक प्रभावी सूत्रसंचालक म्हणून दिसत होते. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच संपले आहे. अशात आता अनेक चाहते महेश मांजरेकरांच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. चाहत्यांच्या मनातील हा प्रश्न सोडवत त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन गोष्टी शेअर केल्या आहेत.

यातील एक पोस्ट पांघरुण या चित्रपटाची आहे. महेश यांनी या चित्रपटाचा एक टीजर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, “पांघरूण पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी.” महेश यांचा हा आगामी चित्रपट नटसम्राट आणि काकस्पर्श च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज होत आहे. तसेच पांघरूण हा चित्रपट पुढल्या वर्षी म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अमोल बावडेकर सोबत अभिनेत्री गौरी इंगवले मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पांघरूण या सिनेमातील दर्जेदार संगीताने सजलेल्या आणि तितक्याच अप्रतिम शब्दांनी फुलवलेल्या गाण्यांचा मनात घर करून राहणारा म्युझिकल ट्रेलर नुकताच सादर करण्यात आला.
हितेश मोडक, पवनदीप साजन आणि डॉ सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली एक झाले ऊन आणि सावली, साहवेना अनुराग नको रे कान्हा, सतरंगी झाला रे रंग मनाचा ही गाणी अप्रतिम आहेत.

धाव घाली आई, देवा पुन्हा आणले किनारी तू मला, देवे ठेविले तैसे रहावे अशी संत सावता माळी आणि संत तुकाराम यांचे सुंदर अभंग देखील चित्रपटात मंत्रमुग्ध करणारे आहेत. कोकणातली साधी भोळी माणसं, नयरम्य परिसर आणि दर्जेदार संगीताने सजलेली एक विलक्षण प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी ठरेल असे म्हणायला हरकत नाही. अभिनेत्री गौरीच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास तिने कुटुंब, किल्लारी या चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. त्या आधी ती चक धूम धूम या रियालिटी शोमध्ये झळकली होती. गौरी सह या चित्रपटात प्रवीण तरडे, प्रभाकर मोरे, विद्याधर जोशी, रोहित फाळके, सुरेखा तळवलकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. महेश मांजरेकर यांचे काकस्पर्श आणि नटसम्राट हे चित्रपट खूप गाजले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यामुळे आता पांघरूण या चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत.
