प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल बद्रिके हा त्याच्या विनोदी पंचसाठी तर लोकप्रिय आहेच. पण सोशल मीडियाचा कसा खुबीने वापर करायचा याची नसही त्याला अचूक माहिती आहे. कुशलचं सामाजिक भान असो किंवा एखाद्या सामाजिक विषयावरचं त्याचं निरीक्षण असो, चाहत्यांना तो नेहमीच अंतर्मुख करत असतो. त्यामुळेच कुशलच्या पोस्ट या कायमच काही ना काही चर्चा घडवून आणतात. नुकताच कुशलने एक फोटो शेअर केला आहे आणि फोटोतील गवतात चक्क त्याला बालपणातील एक अमूल्य गोष्ट सापडली आहे. कुशलनं गावाकडील एका हिरव्यागार मैदानाचा फोटो शेअर केला आहे. त्यात सोबत चुलत भाऊ देखील दिसतायत.
कुशल लिहितो, ‘माझ्या जुन्या घराला लागून एक छोटं मैदान आहे. तसं माझं बालपण घरापेक्षा जास्त वेळ या मैदानातच गेलं खरं तर. अगदी भातुकलीपासून कबड्डी, खोखो, क्रिकेट, आबादुबी, लपंडाव, पतंग ते होळी, दिवाळी, दहीहंडीपर्यंत सगळं सगळं तिथे अनुभवलं. आज माझ्या मुलाला निबंध म्हणून १० मार्कासाठी जे जे विषय आहेत ते ते सगळं “माझं” या मोकळ्या मैदानात शिकून आणि जगून झालंय.’ कुशल पुढे लिहितो, ‘बालपणी इथल्या “गवताचा वास” आमच्या अंगाखांद्याला चिकटून राहायचा. कितीही घासून आंघोळ केली तरी जाता जायचा नाही. हा “वास” आता इतक्या वर्षांनी पाहिलं तर इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो.’ कुशल अगदी नाॅस्टॅलजिक झालेला जाणवतो.
प्रत्येकालाच आपल्या बालपणातल्या गोष्टी लक्षात असतात, त्या तितक्याच मौल्यवानही असतात. सेलिब्रिटींचंही फारसं काही वेगळं नसतं. अभिनेत्याला निसर्गाची हिरवाई आवडते, असं अनेकदा त्याच्या बोलण्यातून येतं. मागे त्यानं एका हिरवळीवरचा फोटो टाकत लिहिलं होतं. ‘आपल्या आजूबाजूचा हिरवा रंग आपल्यात उतरत जातो, मनाला नवी पालवी फुटते आणि हळूहळू आपण बहरत जातो. फक्त पाऊस बनून कुणीतरी “बरसत” राहणार हवं आयुष्यात.’ त्याच्या या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनासाठी चाहते नेहमीच त्याच्या पोस्टची वाट पहात असतात. कुशलने शेअर केलेला फोटो जरी त्याचा असला तरी त्याने सांगितलेली आठवण पाहणाऱ्या प्रत्येकालाच आपलीशी वाटणारी आहे.