कोकणची शान, कोकणचा कोहिनुर ओंकार भोजने आता केवळ विनोदवीर म्हणून नाही तर चक्क चित्रपटाचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, तुमच्यासाठी काहीपण, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा विविध शोमधून ओंकारने विनोदाचे अचूक टायमिंग हेरत प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. बॉईज २, बॉईज ३, घे डबल अशा चित्रपटातून तो झळकला आहे मात्र प्रथमच तो मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे नाव आणि चित्रपटाची नायिका अजून तरी गुलदस्यात असली तरी या आगामी चित्रपटाबाबत ओंकार खूपच उत्सुक आहे. सानवी प्रोडक्शन हाऊस निर्मित आरती चव्हाण या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत.
नितीन सिंधू, विजय सुपेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्णत्वास आले आहे. पुण्यातील भोर परिसरात या चित्रपटाचे काही शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून या चित्रपटाची नायिका ईशा केसकर तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थात त्याच्या नायिकेच्या नावाचा उलगडा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. परंतु ओंकार नायकाच्या रूपातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्याच्या तमाम चाहत्यांना मात्र मोठा आनंद झाला आहे. तू दूर का, ही काय बोलली, अगं अगं आई हे त्याचे लोकप्रिय डायलॉग प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. ओंकार भोजनेबद्दल बऱ्याच जणांना काही खास गोष्टी माहीत नाहीत.
ओंकार हा मूळचा रत्नागिरीतील संगमेश्वरचा. चिपळूणच्या डी बी जे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अभिनयाची ओढ त्याला लागली. कॉलेज मधील विविध नाटक, प्रयोगांच्या माध्यमातून त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. एकांकिका स्पर्धांमधून तसेच विविध नाटकांतून त्याने अभिनय करण्यास सुरुवात केली. आपल्याला ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी’ व्हायचं असं त्याचं लहानपणीचं स्वप्न होतं. पण पुढे अंगच्या कलागुणांमुळे अभिनय क्षेत्रात त्याची गोडी वाढू लागली. कॉलेज मधील आठवणींबद्दल बोलताना तो म्हणतो, नाटकात काम करण्यासाठी शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं, त्यांच्याच प्रेरणेने मी आज या क्षेत्रात कार्यरत आहे. जर मी डीबीजे कॉलेजमध्ये नसतो, तर कदाचित मी कला क्षेत्रातच आलो नसतो. इतकं ह्या कॉलेजने मला भरभरून दिलं आहे.