तू ही मेरी शब हैं, तडप तडप के, तुने मारी एन्ट्री, खुदा जाणे, अप्पडी पोडू, तू ही मेरी शब है, हम रहें या ना रहें, जरा सी दिल में दे जगह तू. सच केह रहा हैं दिवाना अशी कित्येक सुपरहिट गाणी गाऊन केकेने रसिकप्रेक्षकांच्या स्मरणात आपली आठवण ठेवली आहे. काल त्याच्या दुःखद निधनाने संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. गुगलच्या मध्यमातून अनेकजण त्याने गायलेल्या गाण्यांना सर्च करून ती गाणी ऐकत आहेत. ही गाणी केकेनी गायली आहेत याचा खुलासा होताच अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. आपले आयुष्य केकेच्या गाण्याशिवाय अधुरे आहे याची जाणीव जाणकार प्रेक्षकांना कळून चुकली आहे.
केकेला प्रसिद्धी मिळाली ती हम दिल दे चुके सनम चित्रपटातील तडप तडप के दिल में या गाण्यामुळे. केकेचे पूर्ण नाव आहे कृष्णकुमार कुन्नथ. काल मंगळवारी कोलकता येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्याला हृदयाचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे तर अनेक सेलिब्रिटींना या बातमीने मोठा धक्का बसला आहे. आज केके बद्दल माहिती नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. केकेची रिअल लाईफ लव्हस्टोरी एका चित्रपटाच्या कथानकासारखीच आहे असे म्हणायला हरकत नाही. बालपणापासून ज्योती सोबत केकेचे प्रेम जुळले होते. केके जवळ कुठलीच नोकरी नव्हती.
त्यामुळे आधी तू नोकरी कर अशी अट ज्योतिच्या वडिलांनी घातली होती. साधारण तीन महिने केकेने सेल्समनची नोकरी केली. दरम्यान १९९१ साली केके आणि ज्योतीचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर गाण्याची आवड असलेल्या केकेने पल हा अल्बम काढला त्यातील यारों हे गाणं तुफान लोकप्रिय झालं. त्यानंतर हम दिल दे चुके सनम चित्रपटातील तडप तडप के हे गाणं गाऊन त्याने रसिकांची भरभरून दाद मिळवली. त्यानंतर केकेने मागे वळून पाहिलेच नाही. बॉलिवूड, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी भाषेत त्याने गाणी गायली. केके आणि ज्योतीला दोन अपत्ये मुलगी तमारा आणि मुलगा नकुल.
नकुलला गाण्याची आवड असून केकेच्या एका अल्बमसाठी त्याने गाणं गायलं आहे. केकेचे नैसर्गिक निधन झाले यावर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे कारण दवाखान्यात उपचारासाठी गेल्यावर केके सुस्थितीत होता. मृत्यूनंतर त्याच्या ओठांवर आणि डोक्याला जखमा झालेल्या आढळल्या आहेत. अनैसर्गिक मृत्यू अशी कोलकाता पोलिसांनी नोंद केली आहे. या शंकेमुळे केकेचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान केकेच्या गाण्यांनी आपले कॉलेजचे जुने दिवस आठवल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. त्याच्या गाण्याशिवाय आमचं आयुष्यच नाही अशाही आठवणी सांगितल्या जात आहेत.