नटरंग, जोगवा, बालक पालक, पांगीरा, वंशवेल, फँड्री अशा अनेक दर्जेदार चित्रपटातून अभिनेते किशोर कदम यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमात मुशाफिरी करत असताना त्यांनी कविता देखील केल्या. गारवा, जावे कवितांच्या गावा, आणि तरीही मी! हे त्यांचे कवितासंग्रह खूपच लोकप्रिय झालेले आहेत. कवी म्हणून गारवा अल्बमने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. या कवितांमुळे त्यांना सौमित्र अशीही ओळख मिळाली आहे. मुंबई खार कोळीवाडा भागात किशोर कदम यांचे बालपण गेले.
घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच असल्याने आणि काळ्या रंगाचा न्यूनगंड असल्याने त्यांचे बालपणही तशाच परिस्थितीतून गेले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक कविता लिहिली होती. ही कविता वाचून शिक्षिकेने ही कविता पेपरमध्ये छापली होती. त्यानंतर किशोर कदम यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. पाच पाणी भाषण त्यांनी धाडधाड बोलून पूर्ण केले. या स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सत्यदेव दुबे यांच्याशी किशोर कदम यांची ओळख झाल्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. या यशाचा वाटा ते आपल्या पत्नीलाही देतात. किशोर कदम यांच्या पत्नी सुलभा या आकाशवाणी मध्ये निवेदिका म्हणून काम करतात. एवढेच नाही तर मोठमोठ्या सोहळ्यासाठी त्यांनी सूत्रसंचालनही काम केले आहे.
आज सुलभा आणि किशोर कदम यांच्या लग्नाचा वाढदिवस, याचे औचित्य साधून पत्नीसोबतची आठवण सांगितली आहे. ते म्हणतात की, बेल वाजली म्हणून दार उघडलं. हातात केक घेऊन बर्डीचा माणूस. मी विचारलं काये. तर म्हणाला “केक” आता कसला केक? आणि कुणी पाठवला, कशासाठी? पण तितक्यात मुलगा पश्मीनचा फोन “हॅपी अनिव्हर्सरी” म्हणाला. मग एकदम क्लिक झालं, पण घरी का यावंसं वाटत होतं आपोआप ते अचानक लक्षात आलं. आपल्या मुलांनी लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेऊन केक पाठवावा याच्या पेक्षा मोठा आनंद तो काय. पश्मीन! तुझं नाव गुलज़ार साहेबांनी ठेवलंय. त्यामुळे तू “तूच” असू शकतोस, थँक यू मित्रा. हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं.
मी ही कविता माझ्याच बायकोवर लिहिली, आमचं तेंव्हा लग्नही झालं नव्हतं. लिहिल्यावर मी बँड स्टँडच्या टेलिफोन बूथवरून तिला ऐकवल्याची आठवण पक्की आहे. पुढचं इमॅजिन करून लिहिली होती कविता, पण लग्न होऊन वीस वर्षे झाली. तरी अजून तिचा विश्वास बसत नाही की मी तिच्यावरच लिहिली होती ही कविता. लग्नाच्या आधीचा आणि नंतरचा विश्वास यावर वेगळीच लिहावी लागेल. तर, जी कविता आपल्यावरच लिहिलेली आहे. ती आपल्यावर नव्हतीच असं म्हणत वीस वर्ष माझ्याशी भांडणाऱ्या बायकोला कसं समजाऊ की तुझ्यावरच होती गं. पण आता लोकांनी आपापले अर्थ लावून मला वेगळं केलंय. असो, वीस वर्ष! बायको! तुला कळतंय का वीस वर्ष म्हणजे काय? तुला आणि मला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.