प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख. म्हणजेच इंदुरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीतील किर्तनामुळे नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसले आहेत. अनेकदा आपल्या किर्तनामुळे आणि त्यातील परखड बोलण्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. मात्र शुक्रवारी त्यांनी एका वेगळ्याच कारणासाठी पोलीस ठाणे गाठलेले पाहायला मिळाले आहे. मात्र याबाबत इंदुरीकर महाराजांनी मीडियाशी बोलण्याचे आवर्जून टाळलेले पाहायला मिळाले. शुक्रवारी मीडियाला कुठलीही खबर न देता इंदुरीकर महाराज पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली आणि एक अर्ज दाखल केला.
इंदुरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनाच्या बनावट सीडीज बनवल्याचे सांगत एका कंपनी विरोधात तक्रार करणारा एक अर्ज दाखल केला आहे. इंदुरीकर महाराजांनी एका कंपनीला त्यांच्या कीर्तनाच्या सीडीज बनवण्यासाठी अधिकार दिले होते. मात्र त्या संबंधित कंपनीने त्या अधिकारांचा गैरवापर केलेला पाहायला मिळाला. काही जण माझ्या परवानगी शिवाय कीर्तनाच्या बनावट सीडी बनवत आहेत आणि त्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. मराठी बाणा या चॅनलवर माझ्या कीर्तनाचे व्हिडीओ दाखवले जात आहेत, असे इंदुरीकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. माझ्या कीर्तनाचे व्हिडियो चॅनलवर अनधिकृतपणे दाखवले जात आहेत. त्यामुळे कीर्तनात छेडछाड केली जाऊ शकते अशी शंका त्यांनी या तक्रारीत उपस्थित केली आहे.
यातून पुढे चुकीच्या गोष्टी प्रसिद्धीस येतील असेही त्यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याशी इंदुरीकर महाराजांनी विचार विनिमय केला आहे. कंपनीविरोधात तक्रार दाखल झाली असून त्याची चौकशी केली जाईल असे आश्वासन यावेळी इंदुरीकर महाराजांना देण्यात आले आहे. इंदुरीकर महाराज पोलीस अधीक्षक कार्यालयात कशासाठी गेले होते याबाबत मिडीयाला त्यांनी कारण सांगण्याचे टाळले होते. मात्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना या बाबत विचारले असता त्यांनी हा खुलासा केलेला पाहायला मिळाला. संबंधित कंपनीविरोधात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास केला जाईल असे आश्वासन मनोज पाटील यांनी मीडियाशी बोलताना दिले आहे.