महाराष्ट्राची नंबर एकचि मालिका म्हणून ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हापासून टीआरपीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावताना दिसली आहे. डे वन पासून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने मालिकेचे निर्माते सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर कलाकारांचे नेहमीच भरभरून कौतुक करत असतात. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला तेव्हा मालिकेची सर्व टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा या मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे होत्या.

मात्र या मालिकेला डावलून ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवत आहे. मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा घाट टळलेला आहे. मात्र तिकडे तन्वी अर्जुनशी जवळीक साधताना दिसत आहे. त्यामुळे आता या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. यासोबतच मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे. साक्षीची भूमिका मीरा जगन्नाथ हिने साकारली होती. मात्र काही कारणास्तव मीरा ही मालिका सोडणार आहे. त्यामुळे मालिकेत साक्षीच्या भूमिकेत अभिनेत्री केतकी पालव झळकणार आहे. केतकी या मालिकेत रुजू झाली असून तिने शूटिंगला सुरुवात केली आहे. मात्र मीराने ही मालिका का सोडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण साक्षीची भूमिका केतकी उत्तम निभावेल असा विश्वास आहे.

केतकी गेल्या अनेक वर्षांपासून मालिका सृष्टीत काम करते तिने नकारात्मक तसेच सकारात्मक अशा दोन्हीही भूमिका साकारलेल्या आहेत. पण तरीही मिराच्या जागी केतकीला पाहणे प्रेक्षकांना सुरुवातीला थोडे जड जाणार आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेमाची गोष्ट ही एक नवीन मालिका लवकरच दाखल होणार आहे. तेजश्री प्रधान या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्यामुळे ठरलं तर मग मालिकेसमोर एक मोठे आव्हानच उभे राहणार आहे. तेजश्रीचा फॅन फॉलोअर्स खूप मोठा आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेमुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे ती मालिकेत कधी येतेय याचीच प्रेक्षक वाट पाहत होते. तेजश्री छोट्या पडद्यावर आल्यामुळे ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरी समोर एक मोठे आव्हान असणार आहे. पण ठरलं तर मग या मालिकेचे कथानक दमदार आहे आणि मालिकेचे कलाकार आपला टीआरपी नक्कीच राखून ठेवतील असा विश्वास आहे.