अभिनेत्री कविता मेढेकर या मालिका, चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. कविता मेढेकर या पूर्वाश्रमीच्या कविता लाड. लहानपणी कुठल्याही नाटकात, एकांकिकेत न झळकलेल्या कविता लाड यांनी पेपरमधली जाहिरात वाचून “पैलतीर” मालिकेसाठी ऑडिशन दिली. आणि बालकलाकार म्हणून या मालिकेत झळकण्याची त्यांना नामी संधी मिळाली. पुढे ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना डॉ गिरीश ओक एक एकांकिका बसवत होते. कलाकारांची निवडही त्यांनीच केली होती. परंतु त्यातील एक मुलगी आणि एका मुलाचा वाद झाला. गिरीश ओक यांनी या वादामुळे त्या मुलीला तडकाफडकी काढून टाकले.

दारात उभ्या असलेल्या कविता लाड यांना ‘तू या एकांकिकेत काम करणार’ असे सांगितले. कविता लाड यांना अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना डॉ गिरीश ओक यांनी अगोदर एकांकिका वाचायला सांगितली आणि अशा प्रकारे त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. डॉ ओक यांनी कविताचे नाव सुचवल्यामुळेच “घायाळ” या पहिल्या वहिल्या चित्रपटात झळकण्याची संधी त्यांना मिळाली होती. “सुंदर मी होणार” या नाटकाचे काहीच प्रयोग करण्यात येणार होते. मात्र नाट्यनिर्माते सुधीर भट यांनी नाटक पाहिलं आणि कविताचे काम पाहून पुढे व्यावसायिक नाटक बनवायचं ठरवलं. चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली, एका लग्नाची गोष्ट, लपून छपून, उर्फी, एका लग्नाची पुढची गोष्ट अशा मालिका, चित्रपट आणि नाटकांतून त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

मेजवानी परिपुर्ण किचन, जोडी जमली रे या शोचे सूत्रसंचालनही त्यांनी केले. रंगभूमीवर रुळलेल्या कविता मेढेकर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ ही मालिका येत्या १३ मार्चपासून प्रसारित होत आहे. कविता मेढेकर या नव्या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवानी रांगोळे आणि ऋषीकेश शेलार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. शर्मिष्ठा राऊत प्रथमच या मालिकेतून निर्माती म्हणून कलाक्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे नवीन मालिकेसाठी सर्वच कलाकार खूपच उत्सुक झाले आहेत. नाटकातून वेळ काढत कविता मेढेकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत असल्याचे पाहून प्रेक्षकांना देखील आनंद झाला आहे. या नवीन मालिकेसाठी सर्वच कलाकारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.