पुढचं पाऊल या मालिकेमुळे जुई प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. वर्तुळ, तुजविण सख्या रे, सरस्वती अशा मालिकांमधून जुई महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे. मराठी मालिका सृष्टीत अभिनेत्री जुई गडकरी हिचे लवकरच पुनरागमन होत आहे. येत्या ५ डिसेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “ठरलं तर मग” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत जुई गडकरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनाथ मुलांची ताई बनून आपल्या घासातला घास वाढून ही ताई या मुलांचे संगोपन करते. तिच्या या खडतर प्रवासाची कहाणी मालिकेत दाखवली जाणार आहे.

जुई गडकरी सोबत ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव हे देखील या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. जुईला या नव्या मालिकेनिमित्त तिच्या चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या आहेत. खरं तर जुई गडकरी ही मराठी सृष्टीत दाखल झाली ती ओघानेच. एका प्रोडक्शन हाऊसमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. तेव्हा तिला अभिनयाची संधी मिळाली होती; मात्र जुईने ही संधी नाकारली. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकले गेले. आई वडिलांच्या प्रोत्साहनानंतर तिने फोटो शूट करून घेतले आणि मैत्रिणीसोबत एका ओडिशनसाठी गेली. दिग्दर्शकाने जुईलाच ऑडिशन देण्यास सांगितले आणि इथेच निवड करण्यात आली. जुई गेल्या अनेक वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे.

पुढचं पाऊल या मालिकेत काम करत असताना तिला त्रास जाणवू लागला. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने आरोग्याच्या तपासण्या केल्या. तेव्हा मेंदूमध्ये सौम्य ट्युमर असल्याचे निदान झाले. या आजारामुळे जुई कधीही आई होऊ शकत नाही हे डॉक्टरांकडून तिला समजले. या आजाराबाबत माहिती देणारी एक बाब तिने लिहिली होती. तिच्या आजाराबाबत जाणून सगळ्यांना धक्का बसला होता. त्यात तिने म्हटले होते की, हाडांच्या सतत होणाऱ्या झीजमुळे मी दुर्मिळ संधिवाताने आजारी होते, तशी आजही आहे. हा असा आजार आहे जो बरा होत नाही म्हणे! हा इम्युनिटी डिसेबल असून अनुवांशिक असतो. सांधे जॅम होऊ लागतात. तुमच्या शरीराचा एक एक अवयव त्याच्या विळख्यात येत जातो. हे ऐकुन उरलं सुरलं अवसान गळुन गेलं होतं.
मी मनाशी एक गोष्टं ठरवुन होते; काही झालं कितीही शरीर आखडलं तरी कारण न करता व्यायाम करायचा! मग मागील दोन वर्ष वेगळंच वादळ सुरु झालं. मी एकटीच ठाण्यातल्या घरी माझ्या ८ मांजरीं बरोबर अडकले. त्यामुळे माझा पुर्ण वेळ माझ्या बाळांच्या संगोपनात गेला. मांजराच्या पिल्लांची का होईना, मी आई झाले! आता नियमित व्यायामनंतर मला मानेत, पाठीत दुखत नाही. एकावेळेला सहज १०८ सुर्यनमस्कार घालते. माझा आजार बरा झालाय असं नाही, पण दुखणं नक्की कमी झालय! माझ्यासाठी हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. काही लोकांनी माझी “रोगट” म्हणुन चेष्टाही केली. पण आपल्या पाठिशी आपल्या गुरुचं बळ असेल तर काहीही शक्य आहे! फक्त विश्वास हवा आणि या प्रवासात कधीही साथ न सोडणारे सहप्रवासी हवे!