ब्रँड अँबेसिडर ज्याला आपण कॉर्पोरेट अँबेसिडर किंवा त्या ब्रॅंडचे प्रतिनिधित्व करणारा प्रसिद्ध चेहरा म्हणूनही ओळखला जाते. कंपनीची उत्पादने किंवा सेवा यांचे सार्वजनिकरित्या प्रतिनिधित्व करून ब्रँडबद्दल जागरूकता वाढवण्याची जबाबदारी या ब्रँड अँबेसिडरवर असते. मराठी सृष्टीत खूप कमी चेहरे आहेत ज्यांनी हे पद भूषवले आहे. त्यात आता अभिनेत्री जुई गडकरी हिचीही भर पडलेली आहे. स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेमुळे जुई गडकरी हिला मोठी लोकप्रियता मिळाली.

गेल्या काही महिन्यांपासून ठरलं तर मग ही महाराष्ट्राची नंबर एकची मालिका ठरली आहे. त्यामुळे साहजिकच जुई गडकरी ही देखील नंबर एकची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. याचाच फायदा म्हणून जुईला चक्क ब्रँड अँबेसिडर बनण्याचा मान मिळालेला आहे. स्मिता हॉलिडेज या ट्रॅव्हल कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर पदावर जुईची नेमणूक करण्यात आली असल्याने जुईचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. स्मिता ग्रुप ऑफ कंपनी ही महाराष्ट्रातील एक आघाडीची आणि विश्वसनीय संस्था मानली जाते. जयंत गोरे यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

नुकताच छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे १८ ऑगस्ट रोजी संस्थेचा दशकपूर्ती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार येथे करण्यात आला. तर रसिक प्रेक्षकांसाठी सूनहरी गितों का सफरनामा हा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता. त्यात अभिनेत्री जुई गडकरी हिच्या नावाची ब्रँड अँबेसिडर पदी नेमणूक करण्यात आली. जुईने ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.