चला हवा येऊ द्या या मंचाने आजवर अनेक विनोदी कलाकार घडवले आहेत. कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भाऊ कदम, निलेश साबळे, कृष्णा घोंगे, सागर कारंडे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे यांच्या अफलातून टायमिंगमुळे हे कलाकार गेल्या कित्येक वर्षांपासून चला हवा येऊ द्या च्या मंचावरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यात विदर्भातून आलेला अंकुर वाढवे तर आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास समर्थ ठरला आहे.
अंकुर वाढवे हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो उत्तम कविता देखील करतो. ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ हा त्याचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. नुकतेच अंकुरने साल १९९५-९६ या काळात “रुपयाचा प्रवास” कसा झाला हे एका पोस्टद्वारे सांगितले आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट आणि त्याच्या रुपयाचा प्रवास सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आपल्या रुपयाच्या प्रवासाबद्दल यो म्हणतो की..” रुपयाचा प्रवास.. १९९५-९६.. “आई मुलाच्या हातात १० रुपयांची नोट देऊन.. आई: बाबू दुकानात जाय अन ३ ची साखर पत्ती, २ चं खायचं तेल, १ चं डोसक्याच तेल, २ चं चटणी, आठण्याची (५० पै.) हळद, आठण्याचं कुकु, अन १ चं तुलं नड्डे आन मुलगा: अन पेन? आई: मंग नड्डे नको पेन आन मुलगा: अन पेन त २ चा हाये आई: हाव का? अन कांडी (रिफिल) मुलगा: ती १ चीच हाये आई : मंग कांडी आन.. आजमुलगा कामावर येताना रिक्षातून उतरल्यावर, रिक्षावाला: साब २ रुपये छुटा नही, मुलगा: कोई बात नही रखो निघून जातो.”
अंकुरने लिहिलेली ही पोस्ट सध्या त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. त्याच्या नजरेतून त्याने दाखवलेला रुपयाचा प्रवास चाहत्यांना खूपच भावुक करून गेला आहे. चला हवा येऊ द्या मध्ये येण्याअगोदर अंकुरनं सुरुवातीला अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासोबत एका नाटकात काम केलं होत. त्या संधीचं अंकुरनं सोनं केलं. पुढं त्याने गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस,आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स, कन्हैय्या यासारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. ‘जलसा’ या मराठी चित्रपटातही त्यानं काम केलं होतं. यानंतर त्याला ‘चला हवा येऊ द्या’ मध्येही काम करण्याची त्याला नामी संधी मिळाली आणि या संधीमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहोचला.