मराठी मालिका, चित्रपटातून जितेंद्र जोशीने स्वतःची ओळख बनवली आहे. पण अभिनेता होण्यामागचा त्याचा हा प्रवास आईमुळेच घडला हे तो आवर्जून सांगतो. नुकतेच जागतिक मदर्स डे निमित्ताने जिंतेंद्र जोशीने आपल्या नावासमोर त्याच्या आईचं नाव का लावतो याचा खुलासा केला आहे. जितेंद्र शकुंतला जोशी हे नाव त्याने आत्मसात केलं आहे. जितेंद्र लहान असल्यापासूनच त्याच्या आईसोबत आजोळी राहायचा. त्याचे वडील खूप दारू प्यायचे म्हणून मग त्याच्या आईने वडिलांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आई कपडे शिवण्याचे काम करायची. जे पैसे मिळतील त्यातील काही रक्कम ती बचत म्हणून बाजूला काढुन ठेवायची.
आईला गाणी ऐकायला आवड होती शिवाय चित्रपटाच्या स्टोरी ती खूप छान पद्धतीने सादर करायची. अनेकदा त्या जितेंद्रला नाटक पाहायला घेऊन जायच्या. त्यामुळे आपसूकच त्याच्याकडून कविता करण्याचा छंद जोपासला गेला. याचदरम्यान तो आईसोबत पुण्याला भाड्याच्या घरात राहायला आला. मात्र अभिनयाच्या ओढीने त्याने मुंबईच्या दिशेने आपली पाऊलं वळवली. आईने या गोष्टीला कधीच नकार दिला नाही. मात्र जेव्हा मुंबईत जाऊनही काम मिळाले नाही, तेव्हा जितेंद्र पुन्हा आईकडे परतला. आईचा एक गुण मी कधीच घेतला नाही असे तो म्हणतो. त्याची आई आपल्या कमाईतून काहीना काही पैसे जपून ठेवायची. ही गोष्ट जितेंद्रला कधीच जमली नाही. दोन स्पेशल या नाटकाच्या निर्मितीसाठी त्याला जेव्हा घरातले होते नव्हते तेवढे पैसे घ्यावे लागले तेव्हा आईने त्याला त्याची आठवण करून दिली.
पण दोन स्पेशल हे नाटक जेव्हा रंगभूमीवर त्याच्या आईने पाहिलं तेव्हा आपल्या मुलाने योग्य जागी पैसे गुंतवले आहेत याचा विश्वास बसला. एकदा दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फोटो त्याला घ्यायचा होता. अवघ्या ५० पैशाला तो फोटो मिळत होता. पण आईने त्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा मी तो फोटो चोरला होता असे जितेंद्र सांगतो. पण जेव्हा ही गोष्ट त्याच्या आईला कळाली तेव्हा तिने मला खूप मार दिला होता ही आठवण तो सांगतो. पण यामुळे माझ्यात प्रामाणिकपणाची भावना रुजली. जे पैसे हातात येतील ते आपल्या हक्काचे. प्रामाणिक राहिलं तर लोकं सुद्धा आपल्याशी प्रामाणिक राहतील ही गोष्ट त्यावेळी आईने समजावली होती. जो मान सन्मान मला मिळतोय तो सर्व आईमुळेच आहे, हे तो सांगायला विसरत नाही.