छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर येथे १ ऑक्टोबर १९३३ रोजी तब्बल १३ एकर जागेत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक स्टुडिओ उभारला. मेजर दादासाहेब निंबाळकर या स्टुडिओच्या देखरेखिची जबाबदारी सांभाळत होते. पुढे या स्टुडिओचा कारभार भालजी पेंढारकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. या स्टीडिओत अनेक ऐतिहासिक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही संतप्त लोकांनी हा स्टुडिओ जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत स्टुडिओचे खूप मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा हा स्टुडिओ उभारणे भालजी पेंढारकर यांना अशक्य होते. म्हणून त्यांनी ह्या स्टुडिओला लिलावात काढण्याचे ठरवले.
लता दीदींनी १९५९ साली हा स्टुडिओ विकत घेण्याचा निर्णय घेतला. ६० हजारांमध्ये लता दीदींनी जयप्रभा स्टुडिओ विकत घेतला होता. मात्र स्टुडिओ पुन्हा उभारण्यासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने लता दीदींनी या स्टुडिओचा काही भाग विकण्याचा निर्णय घेतला. ज्या भागात स्टुडिओ उभारण्यात आला होता त्या पाऊण एकराचा भाग तसाच ठेऊन बाकीची जागा त्यांनी विकायला काढली. मात्र कोल्हापूर वासियांडून ह्या निर्णयाला विरोध होऊ लागला. अखेर राज्यसरकारने आणि महापालिकेने ही वास्तू हेरीटेज वास्तू म्हणून घोषित करण्याचे ठरवले. मात्र या वास्तूच्या देखभालीसाठी पुरेसा निधी नसल्याने राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर या स्टुडिओत पुरेशा सोयी देखील उपलब्ध होत नव्हत्या.
ही वास्तू तशीच पडून राहिली असल्याने अनेक निर्मात्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. याच कारणास्तव लता मंगेशकर यांनी देखील हा स्टुडिओ विक्रीसाठी काढला होता. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी जोर धरताना दिसली. त्यासाठी जयप्रभा स्टुडिओबाबतही विचारणा झाली. मात्र हा स्टुडिओ गेल्या दोन वर्षांपूर्वीच विकला गेला असल्याचा धक्कादायक खुलासा नुकताच समोर आला आहे. ३ ऑक्टोबर २०१९ रोजीच या स्टुडिओच्या विक्रीसंदर्भात पद्धतशीरपणे गुप्तता बाळगली गेली होती. १५ फेब्रुवारी २०२० रोजीच जयप्रभा स्टुडिओ तब्बल ६ कोटी ५० लाखांमध्ये विकला गेला असल्याचे समोर आले आहे. श्री महालक्ष्मी स्टुडिओज तर्फे ही जागा हेरिटेज इमारतीसह अक्षरशः तुकड्या तुकड्यांमध्ये विकत घेतली गेली आहे.
सचिन श्रीकांत राऊत, महेश अमृतलाल बाफना ओसवाल, सय्यम नरेंद्रकुमार शहा, हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा संघवी, राजू रोकडे, रौनक पोपटलाल शहा संघवी, ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, आदीनाथ शेट्टी यांना जयप्रभा स्टुडिओ विकल्याचे समोर आले आहे. या सर्व व्यवहारात मोठमोठ्या लोकांचा देखील हात असल्याचे बोलले जात आहे. या खुलाश्यावर आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळने जयप्रभा स्टुडिओ समोर आंदोलन करत साखळी उपोषण चालू केले आहे. यावर मराठी सिनेकलाकार आणि कोल्हापूरकरांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.