फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचे आजच्या समाजात काय महत्व आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा मराठी चित्रपट म्हणजे ‘जयंती’. मिलिओरिस्ट फिल्म्स स्टुडिओ निर्मित तसेच शैलेश नरवाडे दिग्दर्शित ॲक्शन, ड्रामा आणि नव्या धाटणीच्या विषयासह “जयंती लोकांचा हक्काचा सण” हा सिनेमा आपल्या हटके नावामुळे प्रदर्शना आधीच चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात अभिनेत्री तीतीक्षा तावडे आणि ऋतुराज यांनी मुख्य भूमिका निभावली आहे. किशोर कदम, पॅडी कांबळे, अंजली जोगळेकर आणि अमर उपाध्यायतर यांचा विशेष सहभाग असून जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांची या चित्रपटात खलनायकाची भूमिका आहे.
चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान एक मोठा अपघात होण्यापासून मिलिंद शिंदे हे थोडक्यात बचावले होते. एक भरधाव आलेल्या क्रेनपासून ते आपला जीव वाचवून बाजूला झाले होते. या अपघातानंतर जयंती या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. यांच्या या घटनेनंतर तर या सिनेमाच्या चर्चेला उधाण आलेलं होतं. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीत दिग्दर्शक मंगेश धाकडे यांनी संगीत दिलेले आहे आणि गायक जावेद अली आणि इतरांच्या आवाजात चार मधुर गाणी आहेत. चित्रपटाच्या क्रूमध्ये अनुभवी आणि पुरस्कारप्राप्त तंत्रज्ञांचा समावेश आहे, ज्यापैकी बहुतेकांनी एफटीआयआय भारतातील प्रमुख चित्रपट संस्थेतून पदवी प्राप्त केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अरि अलेक्सा या कॅमेऱ्यावर करण्यात आले आहे, ज्याचा वापर बॉलिवूडमधील प्रमुख चित्रपटाच्या शूटिंगसाठी केला जातो. जयंती हा चित्रपट येत्या २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होण्याचे जाहीर केले होते मात्र ह्याच दिवशी बॉलिवूड करांनी आडकाठी आणून बहुचर्चित “अंतिम” या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांवर घेतलेली मेहनत त्यावर वाढत जाणारा खर्च आता कसा भरून येईल हा मुख्य प्रश्न निर्मात्यांसमोर उपस्थित होत आहे. अंतिम हा बॉलिवूड चित्रपट मुळशी पॅटर्न या चित्रपटावर आधारित आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून झी स्टुडिओ आणि सलमान खान फिल्म्स मधून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या तगड्या चित्रपटाची देखील तितकीच चर्चा पाहायला मिळाली होती. मात्र या बॉलिवूड चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांचा श्वास कोंडू लागल्याचे चित्र तरी सध्या समोर दिसत आहे. सर्व नियोजन आखून जयंती चित्रपटाने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र आता अंतिम च्या आगमनाने ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाईल की आणखी काय होईल हे लवकरच समजेल. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच सिनेमागृह मिळत नसल्याची खंत कायम व्यक्त केली जाते. यातून कुठल्या राजकीय नेत्याने हस्तक्षेप केल्यास त्यावर नक्कीच ईलाज होईल अशी आशा आहे…