काहीतरी वेगळं करण्याची जिद्द उराशी बाळगून असलेल्या व्यक्ती जीवनाच्या संकटांशी लढण्याची हिम्मत दाखवतात. त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि त्यांचे वास्तवात रूपांतर करतात. जयंती कठाळे यांनी आयटी क्षेत्रातली तब्बल दीड लाखांच्या पगाराची नोकरी सोडून पूर्णब्रह्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली या हॉटेल व्यवसायात त्यांनी पहिले पाऊल टाकले. आज या पूर्णब्रम्हचा विस्तार देश विदेशात वाढवण्यात आला आहे. जयंती कठाळे यांच्यासाठी हा केवळ एक व्यवसाय किंवा उपाहारगृहांची साखळी नव्हती. तर ती एक आधुनिक भारताची कथा होती.
जिथे पारंपारिक धागे विणले जातात आणि संरक्षित केले जातात. विश्वास, परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास, शक्ती, प्रेम, आपुलकीचे मोती जपणारे धागे इथे गुंफलेले पाहायला मिळतील. ही मूल्ये जतन करून त्याचा पाया तयार करण्यात आला ज्यावर पूर्णब्रम्ह बांधले गेले असे त्या म्हणतात. बंगळुरूमध्ये २०१२ मध्ये त्याची सुरुवात झाली. त्यावेळी सगळ्या महिला कर्मचारी नऊवारी साडी नेसणार असा ठराव मांडला. मात्र जेव्हा प्रत्यक्षात नऊवारी साडी घालायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी नावं ठेवण्यास सुरुवात केली. हा काय बावळटपणा चालवलाय? ही साडी नेसून तुझा जीव चाललाय, काय करणं काय चालू आहे तुझं? अशी अनेक लोकांनी नावं ठेवली. त्याचवेळी एका मुलीने त्यांना प्रश्न विचारला.
तुम्हाला वाटत नाही का तुम्ही खूप जास्त कपडे घातले आहेत? यावर जयंती कठाळे यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, ‘बाई, इथं जर मागे आग लागली ना तर समोरची बाईक घेऊन मी निघूनही जाईल, तुला साधं बसताही येणार नाही. नऊवारी फक्त पेशवाई थाट दाखवणारी नाही किंवा एखाद्या डान्सच्या प्रोग्रॅमसाठी नाही. त्यात आमचा आत्मा आहे. त्यात आमचा देह झाकला जातो तसा आमच्या विचारांना पण एक सुदृढता आणणारं वस्त्र आहे. माझ्यासाठी ह्यात सोहळंही मानलं जातं. माझ्यासाठी ह्यात शालीनता येते आणि माझ्यासाठी तो एक शृंगारपण आहे.’ असे त्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या. झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात जयंती कठाळे यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले होते. त्यावेळी त्या प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या होत्या.