२४ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. जयंत सावरकर ८८ वर्षांचे होते मात्र या वयातलाही त्यांचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच होता. सेटवर असताना कुठल्याही कलाकाराला ते आपलेसे करून घेत असत. त्यामुळे ते सर्वांच्या जवळचे अण्णाच झाले होते. त्यांच्यासारखं जगता आलं पाहिजे असे म्हणणारे मिलिंद गवळी अण्णा नेमके खऱ्या आयुष्यात कसे होते हे त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊयात. असं जगता आलं पाहिजे, अण्णांसारखं, माणसाला मिळालेलं हे सुंदर आयुष्य माणसाने कसं छान जगावं हे अण्णा आपल्याला शिकवून गेले.
आपल्या कामावर, आपल्या कलेवर असं प्रेम करावं, सातत्याने, मन लावून, अगदी श्रद्धेने कला कशी जोपासावी हे अण्णांकडूनच आपण शिकलं पाहिजे. १९८४ सालापासूनची आमची ओळख, गोविंद सराया यांच्या वक्त से पहले मध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केले. त्यानंतर १९९४ मध्ये मनोहर सरवणकरांच्या दैव जाणिले कुणी या दूरदर्शनच्या टेलीफिल्म मध्ये आम्ही बापलेकाची भूमिका केली. त्यानंतर एकदम २०२२ मध्ये आई कुठे काय करते मध्ये काम केलं. म्हणजे तब्बल ३८ वर्ष मी अण्णांना माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ओळखतो. आता वयाच्या ८७ वर्षाचे अण्णा आई कुठे काय करते च्या सेटवर, यायचे अगदी वेळेवर call time च्या अर्धा तास आधी. एखादा छानसा कुडता घालून त्याच्यावर छानस जॅकेट आणि Hat असायची.
मग वेळ न घालवता मेकअप करून, स्वतःच धोतर छानस नेसून, एकदम रेडी व्हायचे. मग दिवसभराचे सगळे सीन्स ते मागवून घ्यायचे. मग त्या अख्या सीन्सचं मनन चिंतन पाठांतर करत शांतपणे बसायचे. बरं अण्णांनाच त्या सीन्स मध्ये जास्त बोलायचं असायचं, बर एक दोन पानं नाही तर १७ ते १८ पानांचा एक सीन असायचा. पाठ करून त्यांना ज्या काही शंका, किंवा suggestions असतील त्या व्यवस्थित त्याचं निरसन करून घ्यायचे. एकदा का त्यांच्या डोक्यात तो सीन फिट बसला की मग ते गप्पा मारायला मोकळे व्हायचे. आमची एकच मेकअप रूम होती, त्यामुळे अण्णांच्या जुन्या आठवणी ऐकायला फार मजा यायची. ते Encyclopedia होते. बारा ते चौदा तासाचं शूटिंग, जिथे अगदी so call तरुण मंडळी संध्याकाळपर्यंत ढेपाळलेली असायची.
इथे अण्णा पॅकअप होईपर्यंत अगदी fresh, energetic असायचे. Set वर एका professional कलाकाराने कसे असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. अण्णांनी इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत की ज्यांना ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आहे ते खरंच भाग्यवान आहेत. मी आत्ताच जवाहर बाग स्मशान भूमी ठाणे येथे अण्णांचं Electric Cremation करून घरी आलो. आत्ता आण्णा शरीराने नाहीत पण यांचा प्रसन्न चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला आहे.मिश्किल स्वभाव, आयुष्यं कसं छान जगावं. आण्णा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत.